मुंबई: गुन्हेगारांवर पाळत ठेवली असती तर समजू शकलो असतो. पण पत्रकार, दलित संघटनेचे नेते आणि बुद्धिजीवींवर पाळत ठेवण्याचं कारण काय, असा सवाल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपस्थित केला. हेरगिरी करणाऱ्या एजन्सीनं आपण याबद्दलचं तंत्रज्ञान केवळ सरकारला विकत असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून झालेली हेरगिरीमागे सरकारचा हात असावा असा संशय त्यांनी व्यक्त केला. देशातलं सरकार सर्वसामान्यांना मोकळेपणानं जगून देत नाही. व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून होणारी ही हेरगिरी अमेरिकेत उघडकीस आली. त्यामुळे याबद्दलची माहिती आपल्याला समजली. अन्यथा याविषयीची कोणतीही माहिती आपल्यापर्यंत पोहोचलीत नसती, असं पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी अमेरिकेत गाजलेल्या वॉटरगेट प्रकरणाचा संदर्भ दिला. वॉटरवेट प्रकरणात अमेरिकन अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांचा सहभाग उघड झाल्यानंतर त्यांच्यावर राजीनाम्याची नामुष्की ओढवली होती. त्यामुळे व्हॉट्स अॅप हेरगिरी प्रकरणात सरकारचा सहभाग असल्याचं समोर आल्यास त्यांनीही सत्तेतून पायउतार व्हावं, असंदेखील ते पुढे म्हणाले.व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून आपल्याच देशाच्या नागरिकांवर ठेवली जाणारी पाळत ही मागच्या दारानं येणारी हुकूमशाही असल्याचा दावा त्यांनी केला. हेरगिरीसाठी आवश्यक असणारं स्पायवेअर आम्ही फक्त सरकारला देतो, असा संबंधित कंपनीचा दावा आहे. त्यामुळे हेरगिरी कोणी केली हे उघड आहे. यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं. गुजरातची संस्कृती देशभरात नेण्याचा प्रयत्न सध्या काहींकडून सुरू आहे. संजय जोशी कोण होते, त्यांचं पुढे काय झालं, हे सर्वांना माहिती आहे. त्यावेळी जे जोशींसोबत झालं, तेच आता व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून सुरू आहे, असं आव्हाड म्हणाले.
व्हॉटसअॅप हेरगिरी प्रकरण: ही तर मागच्या दारानं येणारी हुकूमशाही; राष्ट्रवादी आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2019 3:45 PM