नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल तीन कोटींवर पोहोचली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,00,312 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असून रुग्णांचा आकडा 3,04,58,251 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 46,617 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 853 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या संकटात लोकांसाठी विविध योजना लाँच करण्यात आल्या आहेत. तसेच सरकारच्या वतीने गरजुंना, गरिबांना मदत करण्यात येत आहे. अनेक स्वयंसेवी संस्थांनीही लोकांना मदतीचा हात दिला आहे. अशातच सोशल मीडियावर अनेक अफवा पसरवणारे मेसेज हे व्हायरल होत आहेत. असाच एक मेसेज सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये कोरोना केअर फंडमधून सर्वांना 4000 रुपये देण्यात येणार आहेत. खाली देण्यात आलेला फॉर्म भरून अर्ज करा आणि 4000 रुपये मिळवा असं म्हटलं आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो देखील वापरण्यात आला आहे. प्रेस इन्फर्मेशन ब्युरोने (Press Information Bureau) व्हायरल होणारा हा मेसेज खोटा असल्याचं म्हटलं आहे. तसेच असून केंद्र सरकारने अशाप्रकारची कोणतीही घोषणा केलेली नाही असं स्पष्टीकरण पीआयबीने दिलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
गेल्या काही दिवसांपासून देशात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन घोषित करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. असाच एक मेसेज व्हायरल होत आहे. या मेसेजमुळे लोकांमध्ये भीतीचे आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही ठिकाणी वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. अनेक राज्यांमध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवरच सध्या पुन्हा एकदा देशभरात संपूर्ण लॉकडाऊनची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. याबाबतचे अनेक मेसेजही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. एका न्यूज चॅनलचा स्क्रीनशॉट आहे. यामध्ये देशात कोरोनाची तिसरी लाट सुरू झाल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे 1 जुलै ते 31 जुलै कडक लॉकडाऊन असंही यात लिहिण्यात आलं आहे. मात्र 1 जुलै ते 31 जुलै दरम्यान देशात संपूर्ण लॉकडाऊन लागू होत असल्याचं वृत्त खोटं असल्याचं आता समोर आलं आहे.
धोका कायम! कोरोनाचा वेग मंदावताना देशातील 'या' 6 राज्यांनी वाढवलं टेन्शन; तज्ज्ञांची टीम रवाना
देशातील सहा राज्यांमध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सहा राज्यांमध्ये तज्ज्ञांच्या विशेष टीम रवाना केल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणं आणि उपाययोजनांसाठी या टीम पाठवण्यात आल्या आहेत. केरळ, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, मणिपूर, ओडिशा, आणि छत्तीसगडचा यात समावेश आहे. विशेष टीम राज्यांमध्ये कोरोना व्यवस्थापन, देखरेख, कंटेन्मेंटची प्रक्रिया आणि टेस्टिंग सारख्या बाबी पाहणार आहे. केंद्रीय टीम या राज्यांमधील कोविड स्थितीचे मूल्यांकन करतील आणि आवश्यक उपयायोजना सुचवतील, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.