लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : हवामान बदलामुळे भारतातील गहू आणि तांदळाचे उत्पादन ६ ते १० टक्क्यांनी घटेल. त्यामुळे त्याची महागाई वाढेल. यामुळे कोट्यवधी लोकांच्या परवडणाऱ्या अन्नधान्याच्या उपलब्धतेवर, अन्न सुरक्षेवर परिणाम होईल, असा इशारा हवामान खात्याने दिली आहे. येत्या काळात पाणीटंचाईचा सामनाही करावा लागेल.
किनाऱ्यावरील समुद्राचे पाणी अधिक उष्ण होत असून, त्यामुळे मासे खोल समुद्रात थंड पाण्याच्या दिशेने सरकत आहेत. या गोष्टीमुळे मासेमारी व्यवसायाला मोठा फटका बसला. हवामान खात्याचे संचालक मृत्युंजय महापात्र यांनी सांगितले की, हवामान बदलामुळे गहू व तांदूळ या पिकांच्या उत्पादनात घट झाल्यामुळे त्याचा शेतकऱ्यांवर व देशाच्या अन्नसुरक्षेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
वेस्टर्न डिस्टर्बन्सेस कमी झाल्याने हिमालयातील विविध भागांत व त्याच्या पायथ्याशी राहणाऱ्या अब्जावधी लोकांना भविष्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागेल, असे केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. रवीचंद्रन यांनी सांगितले.
पुढील अनेक वर्षे घट होत राहणार
- नॅशनल इनोव्हेशन्स इन क्लायमेट रिसायलेंट ॲग्रिकल्चर या संस्थेने म्हटले आहे की, २१०० सालापर्यंत भारतात गव्हाचे उत्पादन ६ ते २५ टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे.
- २०५० पर्यंत तांदळाचे उत्पादन ७ टक्के, तर २०८० पर्यंत १० टक्क्यांनी घटण्याचा अंदाज आहे. भारतीय लोकसंख्येचा निम्म्याहून अधिक हिस्सा शेतीवर अवलंबून आहे.
- ११३.२९ दशलक्ष टन देशात गव्हाचे उत्पादन (जगाच्या तुलनेत १४ टक्के)
- १३७ दशलक्ष टन तांदळाचे उत्पादन (२०२३-२४ची आकडेवारी)
- १.४ अब्ज भारतीयांचे प्रमुख अन्न.
- ८० टक्के लोक सरकारकडून मिळालेल्या अन्नधान्यावर अवलंबून आहेत.