मध्य प्रदेशमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. खरगोन जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 70 किलोमीटर अंतरावर असलेल्या आदिवासी बहुल झिरन्या ब्लॉकमध्ये गर्भवती आदिवासी महिलांना आरोग्य सुविधा मिळत नाहीत. गरोदर महिलांना रुग्णालयात नेण्यासाठी 108 रुग्णवाहिकेची सोय आहे, मात्र रुग्णवाहिका गावात पोहोचत नाही.
बुधवारी सायंकाळी चौपली गावातील 28 वर्षीय महिला आणि बळीराम यांची पत्नी रविताबाई हिला अचानक प्रसूती वेदना होऊ लागल्याने कुटुंबीयांनी रुग्णवाहिका बोलावली. अनेक प्रयत्नांनंतर 108 रुग्णवाहिकेच्या चालकाशी बोलणं झालं असता त्याने वाहन उपलब्ध नसल्याचं सांगून फोन बंद केला तसेच नंतरही फोन उचलला नाही.
कुटुंबीयांना प्रसुती वेदना होत असलेल्या महिलेला बैलगाडीवरून 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या हेलापडावा उपआरोग्य केंद्र रुग्णालयात नेलं. गरोदर रविताबाई तब्बल दोन तासांनी आरोग्य केंद्रात पोहोचल्या. या घटनेचा एक व्हि़डीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
या प्रकरणाबाबत ब्लॉक मेडिकल ऑफिसर सुनील चौहान सांगतात की, चौपाली येथील रविताबाई या महिलेने हेलापडावा हॉस्पिटलमध्ये मुलाला जन्म दिला आहे. डिलिव्हरी झाली आहे. आई आणि बाळ दोघेही निरोगी आहेत. 108 रुग्णवाहिका वेळेवर न पोहोचल्याबाबत बीएमओ म्हणाले की, आम्ही या प्रकरणाची चौकशी करू. आजतकने याबाबतचे वृत्त दिले आहे.