राजकारणात कोणावर काय वेळ येईल सांगता येत नाही. आजचा राव उद्याचा रंक होईल, की आजचा रंक उद्याचा राव होईल. काहीसे असेच माजी केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम आणि सध्याचे गृहमंत्री अमित शहा यांच्या बाबतीत घडले आहे. फरक एवढाच आहे, ९ वर्षांपूर्वी अमित शहागुजरातचे गृहमंत्री होते आणि चिदंबरम सध्या माजी मंत्री आहेत.
सीबीआयला 26 जुलै पर्यंत सोहराबुद्दीन एन्काऊंटर प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्याची मुदत देण्यात आली होती. शहांविरोधात आरोपपत्र दाखल झाल्यानंतर तत्कालीन मोदी सरकारच्या गृहमंत्रीपदाचा अमित शहा यांनी राजीनामा दिला होता. 2005 मध्ये सोहराबुद्दीन हैदराबादहून सांगलीला बसने येत होता. त्यावेळी वाटेतून त्याला गुजरात पोलिसांनी ताब्यात घेतले होते. सोहराबुद्दीनचा फेक एन्काऊन्टर केल्याचा, अपहरण, खंडणी असे आरोप शहांवर होते. तसेच या एन्काऊंटरनंतर तीन दिवसांनी त्याची पत्नी कौसर बीला ठार करण्यात आले होते.
अमित शहांनी ऐकवलेला शेर आज खरा केला....''મારી ઓટ જોઈ કોઈ કિનારે ઘર ન બાંધે, હું સમંદર છું, પાછો આવીશ.'' म्हणजेच ''माझी ओहोटी पाहून, किनाऱ्यावर घर बांधू नको; मी समुद्र आहे, पुन्हा जरूर येईन''. आज अमित शहा केंद्रीय गृहमंत्री आहेत आणि चिदंबरम यांच्यामागे सीबीआय, ईडी लागली आहे. यामुळे पुढील घडामोडी नक्कीच पाहण्यासारख्या असतील.