- हरीश गुप्तानवी दिल्ली - महाराष्ट्रासह चार राज्यांमधील पाच लोकसभा जागांवर पोटनिवडणुका घेण्याच्या निर्णयाबाबत निवडणूक आयोग द्विधा मन:स्थितीत आहे. या जागांमध्ये पुणे, चंद्रपूर (महाराष्ट्र), गाझीपूर (उत्तर प्रदेश), वायनाड (केरळ), अंबाला (हरयाणा) यांचा समावेश आहे. मोदी आडनावाची बदनामी केल्याच्या प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दोषी ठरविल्यानंतर तसेच शिक्षा सुनावल्यामुळे त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. ते वायनाडमधून निवडून आले होते.
राहुल गांधी व अफझल अन्सारी यांना स्वतंत्र प्रकरणांमध्ये अपात्र ठरविल्याने अनुक्रमे वायनाड व गाझीपूर लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली. भाजपचे दोन खासदार गिरीश बापट व रतनलाल कटारिया, काँग्रेसचे खासदार सुरेश धानोकर यांच्या निधनामुळे अनुक्रमे पुणे, अंबाला, चंद्रपूर येथील लोकसभा जागा रिकाम्या झाल्या. या पाचही लोकसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका होणे आवश्यक आहे.
आगामी लोकसभा निवडणुका अवघ्या ११ महिन्यांनी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता या पाच लोकसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका घेतल्याने कोणालाही फायदा होणार नाही, असा एक मतप्रवाह आहे. लोकसभेची जागा रिकामी झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत तिथे पोटनिवडणूक घेणे आवश्यक आहे. मात्र, त्यासाठी खासदाराचा उर्वरित कार्यकाळ एक वर्षापेक्षा कमी नसावा, अशी अट आहे. लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या १५१-अ कलमामध्ये तसे म्हटले आहे.
केंद्राशी सल्लामसलतनिर्धारित कालावधीत पोटनिवडणुका घेणे शक्य नाही, असे मत केंद्र सरकारने कळविल्यास निवडणूक आयोग पोटनिवडणुका न घेण्याचा निर्णय घेऊ शकते; पण त्याआधी निवडणूक आयोग केंद्र सरकारशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना बदनामी प्रकरणात न्यायालयाकडून अद्याप दिलासा मिळालेला नाही. त्या पार्श्वभूमीवर वायनाड लोकसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणुकीचा घेण्याबाबत निवडणूक आयोग लावत असलेला विलंब बुचकळ्यात पाडणारा आहे.
विधानसभा निवडणुकांसोबत लोकसभा पोटनिवडणुका?येत्या नोव्हेंबर- डिसेंबर महिन्यात पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याच वेळी पाच लोकसभा जागांवरील पोटनिवडणुका निवडणूक आयोग घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, या पोटनिवडणुकांबाबत भाजपचे महाराष्ट्र, केरळमधील नेते फार उत्सुक नाहीत.