नवी दिल्ली: पाच राज्यांच्या निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाले. या पाचपैकी चार राज्यांत भारतीय जनता पक्षाची सत्ता होती. ती राखण्यात भाजपला यश आलं आहे. उत्तरप्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोव्यात आपनं बहुमत मिळवलं. उत्तर प्रदेशात गेल्या ३ दशकांपासून सत्ताधाऱ्यांचा पराभव होत आला. मात्र ही परंपरा मोडीत निघाली. उत्तराखंडच्या निर्मितीपासून राज्यात कायम भाजप, काँग्रेसला आलटून पालटून सत्ता मिळत राहिली. मात्र ही प्रथा मतदारांनी यंदा मोडीत काढली आणि भाजपला सत्तेत कायम ठेवलं. या निकालानंतर अनेकांना माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींचे दोन दशकांपूर्वीच शब्द आठवले.
आम्ही त्या क्षणाची वाट पाहू, जेव्हा आम्हाला स्पष्ट बहुमत मिळेल. आज माझी चेष्टा केली जातेय, पण एक वेळ अशी येईल, जेव्हा लोक तुमची चेष्टा करतील. दोन दशकांपूर्वी अटल बिहारी वाजपेयींचं सरकार अवघ्या एका मतानं कोसळलं होतं, त्यावेळी लोकसभेत बोलताना वाजपेयींनी त्यांच्या भावना अशा शब्दांमध्ये व्यक्त केल्या होत्या. ते शब्द आज खरे ठरताना दिसत आहे.
काँग्रेसचे खासदार गिरधर गोमांन यांनी लोकसभेत केलेल्या मतदानानं वाजपेयी यांचं सरकार कोसळलं होतं. मात्र दोन दशकांमध्ये परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. पाच राज्यांमध्ये काँग्रेसचा धुव्वा उडाला आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाच्या झाडूनं काँग्रेसचा झाडूनं पराभव केला. त्यानंतर सोशल मीडियावर #atalbiharivajpayee ट्रेंड होऊ लागला. २०१४ मध्ये केंद्रात भाजपचं सरकार आलं. तेव्हापासून देशभरात काँग्रेसच्या पतनाची सुरुवात झाली. उत्तर प्रदेशनं काँग्रेसला अनेक दिग्गज नेते दिले. त्याच उत्तर प्रदेशात आता काँग्रेसला केवळ २.३३ टक्के मतं मिळाली. तर भाजपला ४१.२९ टक्के मतदान झालं. सत्ता असलेल्या पंजाबमध्येही काँग्रेसची धूळधाण उडाली. पंजाबमध्ये काँग्रेसला २२.९८ टक्के मतं मिळाली. तर आपनं ४२.०१ टक्के मतं मिळवत सत्ता मिळवली.
अंधेरा छटेगा, कमल खिलेगा, हे अटलबिहारी वाजपेयींचे शब्द आज खरे ठरताना दिसत आहेत. आम्ही मेहनत केली आहे. आम्ही संघर्ष केला आहे. हा ३६५ दिवस चालणारा पक्ष आहे. आम्ही केवळ निवडणुकीत दिसत नाही. आम्ही बहुमताची वाट पाहू, अशा शब्दांत वाजपेयींनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या होत्या. गेल्या ८ वर्षांत भाजपनं देशभरात जोरदार कामगिरी केली आहे. लोकसभा असो वा विधानभा निवडणुका, भाजपनं नेत्रदीपक कामगिरी केली आहे.