लखनौ - लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यापूर्वी नेत्यांमधील शाब्दिक चकमकी वैयक्तिक पातळीवर पोहोचल्या आहेत. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अलवर बलात्कार प्रकरणावरून मायावतींना लक्ष्य केल्यानंतर आता मायावतींनीही मोदींवर जोरदार टीका केली आहे. भाजपामध्ये खासकरून विवाहीत महिला त्यांचे पती मोदींकडे गेल्यावर हा विचार करून घाबरतात. कदाचित मोदी आपल्या पत्नीप्रमाणेच आम्हालाही आपल्या पतीपासून वेगळे करणार नाहीत ना, अशी भीती त्यांना वाटते अशी जळजळीत टीका मायावती यांनी केली.
अलवर बलात्कारकांडावरून मोदींनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना मायवती यांनी नरेंद्र मोदींवर वैयक्तिक टीका करत हल्ला चढवला. ''राजकीय लाभासाठी आपल्या पत्नीला सोडणारे नरेंद्र मोदी हे बहीण आणि पत्नीचा सन्मान करणे म्हणजे काय हे कसे जाणणार. भाजपा नेते जेव्हा मोदींना भेटायला जातात तेव्हा त्यांच्या पत्नी घाबरतात. कारण मोदी आपल्या पत्नीप्रमाणेच आम्हालाही आपल्या पतीपासून वेगळे करणार नाहीत ना अशी भीती त्यांना वाटते.'' अशी टीका मायावती यांनी केली.दरम्यान, मायावतींनी केलेल्या या वक्तव्याबाबत भाजपाने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मायावतींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी जे शब्द वापरले आहेत ते अत्यंत अशोभनीय आहेत. हा कसला विचार आहे. तुम्ही मोदींचा एवढा द्वेश का करता? मोदींनी आपल्या कुटुंबाऐवजी देशालाच परिवार मानल्याने म्हणून का? अशी विचारणा भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे. मोदींवर टीका करताना मायावती पुढे म्हणाल्या की, नरेंद्र मोदी हे अलवर येथील बलात्कारप्रकरणी एवढे दिवस गप्प होते. मात्र मी बोलल्यानंतर त्यांनी आपल्या पक्षाला राजकीय लाभ मिळावा म्हणून आपले घाणेरडे राजकारण सुरू केले आहे.