पाटणा - बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि हिंदुस्तानी अवाम मोर्चाचे अध्यक्ष जितन राम मांझी यांनी समाजवादी पक्षाचे खासदार आझम खान यांची पाठराखण केली आहे. आझम खान यांची पाठराखण करताना, मांझी यांनी चुकीचे उदाहरण देत खान यांच्या वक्तव्याचे समर्थन केले. आझम यांच्या वक्तव्याकेड त्या नजरेतून बघने चुकीचे असल्याचेही मांझी यांनी म्हटले आहे.
लोकसभेत तिहेरी तलाक विधेयकावर चर्चा सुरू असताना समाजवादी पार्टीचेखासदार आझम खान यांच्या विधानानं वाद झाला होता. आझम खान यांनी एक शेर सादर करत त्यांच्या भाषणाची सुरुवात केली. त्यावेळी लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर भाजपाच्या खासदार रमा देवी बसल्या होत्या. त्यांच्याकडे पाहत खान यांनी वादग्रस्त विधान केलं. 'आप मुझे इतनी लगती है की मेरा मन करता है की आप की आँखो में आँखे डाले रहूँ' असं आझम खान यांनी म्हणताच लोकसभेत गदारोळ झाला. त्यानंतर आझम खान सदनातून बाहेर पडले. मात्र, आझम खान यांच्या वक्तव्यावरुन सभागृहात गदारोळ माजला होता. संसदेतील सर्वच पक्षाच्या महिला खासदारांनी आजम खान यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. तर, भाजपा खासदार आणि मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आझम खान यांचे निलंबन करण्याची मागणी लोकसभा अध्यक्षांकडे केली होती. मात्र, आझम खान यांच्या वक्तव्याचं जितन राम मांझी यांनी समर्थन केलं आहे. याप्रकरणी बोलताना मांझी यांनी आजम खान यांना राजीनामा न देण्याचा सल्ला दिला आहे. आझम खान यांच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं मांझी यांनी म्हटलं आहे. तसेच, आई-मुलांच किंवा भावा-बहिणीचं चुंबन हे सेक्स होऊ शकत नाही. आझम यांनीही त्याच भावनेनं आपलं वक्तव्य केल्याचं मांझी यांनी म्हटलं आहे.