ऑनलाइन लोकमत
आग्रा, दि. 10 - मी मुख्यमंत्री असताना बलात्का-यांना दयेची भीक मागायला लावली असं वक्तव्य केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी केलं आहे. उत्तर प्रदेशात प्रचारसभेदरम्यान लोकांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 'बलात्कारी जोपर्यंत दयेची भीक मागत नाहीत तोपर्यंत पिडितांसमोरच त्यांचा छळ केला पाहिजे. मी जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा मी हे करायला लावलं होतं', असं उमा भारती बोलल्या आहेत.
गतवर्षी दिल्लीजवळील बुलंदशहर येथे हायवेवर प्रवास करणा-या महिला आणि तिच्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराचा उल्लेख करताना उमा भारती यांनी हे वक्तव्य केलं. यावेळी त्यांनी समाजवादी पक्षाला धारेवर धरत अशा आरोपींना जामीन मिळू नये यासाठी सरकारकडून काहीच प्रयत्न केला जात नसल्याचा आरोप केला.
यावेळी उमा भारती यांनी बलात्का-यांना कशाप्रकारे शिक्षा दिली गेली पाहिजे सांगताना, 'त्यांना उलट टांगून जखमांवर मिठ आणि चटणी चोळली पाहिजे. असह्य वेदना होऊ लागल्यानंतर त्यांच्या आरोळ्या माता आणि भगिनींनी पाहायला हव्यात', असं म्हटलं आहे. मी मुख्यमंत्री असताना याचा अंमल कशाप्रकारे केला होता हे सांगायला त्या विसरल्या नाहीत.
Rapists should be tortured in front of victims,then they will beg for forgiveness. When I was CM i made them do it:Union Minister Uma Bharti pic.twitter.com/6ZVjf76qmM— ANI (@ANI_news) February 10, 2017
'मी पोलिसांना आरोपींना उलटं टांगून जोरदार चोप देण्यास सांगत असते. ते रडेपर्यंत त्यांना मारा असा आदेशच दिला होता. त्यांना फटके पडत असताना पीडितांना खिडकीतून हे सर्व बघायला सांगत असे. जेव्हा पोलीस अधिकारी आक्षेप घेत असे, तेव्हा हे लोक दानव आहेत, त्यांना मानवाधिकार असून शकत नाही. रावणाप्रमाणे त्यांची मुंडकी छाटली पाहिजे असं सांगत असे', असं उमा भारती बोलल्या आहेत.