छत्तीसगढ - राहुल गांधी यांच्या आदेशाने पक्षाचे राष्ट्रीय संघटन सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल यांनी छत्तीसगढ प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या जागी मोहन मरकाम यांची नियुक्ती केली. नव्याने निवडलेल्या अध्यक्षांसाठी आयोजित कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री भूपेश बघेल भावूक झाल्याने त्यांना रडू कोसळले. भर कार्यक्रमात त्यांनी आपल्या भावनांना अश्रूंनी मोकळी वाट करून दिली.
छत्तीसगढमध्ये शनिवारी नव्याने निवडलेल्या प्रदेश अध्यक्षांसाठी काँग्रेसकडून कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना भाषण देताना रडू कोसळले. काँग्रेस पक्षाचे नेते आणि पदाधिकारी यांनी दिवस रात् एकत्र करून पक्षासाठी घेतलेल्या कष्टाच्या जोरावर छत्तीसगढमध्ये सत्ता मिळाली असल्याचे सांगत असताना, बघेल हे अचानक भावूक झाले. कंठ भरून आल्याने क्षणभरासाठी त्यांच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते. अखेर अश्रूंनी भावनांना मोकळी वाट करून दिली आणि बघेल यांच्या डोळ्यात अश्रू आले.
यावेळी बघेल म्हणाले की, २०१३ मध्ये छत्तीसगढमध्ये झालेल्या पराभवानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी माझी प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली. त्यावेळी लोकसभा निवडणुका तोंडावर होत्या. २०१४ च्या निवडणुकीत राज्याच्या परिस्थितीबाबत आम्ही चिंतीत होते. मात्र २०१४ नंतर आमच्या पक्षाच्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी जे राजकीय युद्ध पुकारले ते सत्तेत येई पर्यंत सुरु ठेवले.