नवी दिल्ली : कर्नाटकमध्ये बंडखोरी झाल्याने अल्पमतात आलेल्या मुख्यमंत्री कुमारस्वामींनी गुरुवारी विश्वासदर्शक ठराव मांडला खरा मात्र, मतदान घेण्यास विलंब केला जात आहे. त्यातच राजपालांनी कुमारस्वामींना पत्र लिहून शुक्रवारी दुपारी 1.30 वाजेपर्यंत मतदान घेण्याच्या सूचना केल्या होत्या. यावर आक्षेप घेत मुख्यमंत्री सर्वोच्च न्यायालयात गेले होते. न्यायालयाने आज कुमारस्वामींना दिलासा दिला आहे.
काँग्रेसच्या 13 आणि जेडीएसच्या 3 अशा 16 आमदारांनी राजीनामे दिले होते. यामुळे भाजपने सत्तास्थापनेचा दावा करत बहुमत चाचणी घेण्याची मागणी केली होती. तसेच बंडखोर आमदार मुंबईतील पंचतारांकीत हॉटेलमध्ये आश्रयाला आले होते. यानंतर रंगलेल्या नाट्याने कर्नाटकमधील राजकीय परिस्थिती दाखविली होती.
दोन अपक्ष आमदारांनी केलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. तसेच बहुमत चाचणीवरील मतदान कधी घ्यावे हे विधानसभा अध्यक्षांनी ठरवावे, असे सांगितले आहे. यामुळे आज मतदान होईल की नाही यावर संभ्रम निर्माण झाला आहे.