सुकमा - छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात मागील आठवड्यात नक्षलींसोबत झालेल्या चकमकीत एका जवानाला त्याची बहिण सापडली. जी बहिण काही दिवसांपूर्वी नक्षली बनली होती. नक्षली चकमकीदरम्यान हे दोन्ही भाऊ बहिण समोरासमोर आले. ही घटना 29 जुलै रोजी घडली आहे. जेव्हा छत्तीसगडमधील पोलीस जवान वेट्टी रामा एका नक्षलविरोधी ऑपरेशनसाठी सुकमा परिसरात पाठविले गेले.
माहितीनुसार नक्षलींची साथ सोडून काही वर्षांपूर्वी वेट्टी रामा छत्तीसगड पोलिसात भरती झाला. वेट्टी रामा मागील काही वर्षापासून पोलीस आणि सीआरपीएफ जवानांसोबत नक्षलविरोधी अभियानासाठी काम करत आहेत. 29 जुलै रोजी रामा एका टीमसोबत सुकमा जिल्ह्यात नक्षली असल्याची माहिती मिळाल्यानंतर गेले होते. त्यावेळी चौकशी दरम्यान या परिसरात वेट्टी रामा यांची भेट त्यांची बहिण वेट्टी कन्नी हिच्याशी झाली ती या परिसरात नक्षली म्हणून कार्यरत आहे.
वेट्टी कन्नी हिला पाहताचा पोलिसांनी फायरिंग सुरु केली. एसएसपी शलभ सिन्हा यांनी सांगितले की, चकमकीदरम्यान वेट्टी कन्नी पळून जाण्यात यशस्वी झाली. मात्र तिच्या दोन साथीदारांना पोलिसांनी ठार केलं आहे. शलभ सिन्हा यांनी सांगितले की, वेट्टी रामाने नक्षलींची साथ सोडून पोलीस सेवा जॉईन केली. रामाने अनेकदा बहिणीला पत्र लिहून नक्षलींची साथ सोडून देण्यासाठी पत्र लिहिलं. मात्र त्याच्या प्रयत्नांना यश आलं नाही. रामाने यंदाच्या रक्षाबंधनाच्या दिवशी भेट म्हणून आपल्या बहिणीला चुकीचा मार्ग सोडून येण्याची विनंती केली आहे. तसेच माझी बहिण सण साजरा करण्यासाठी तयार नसली तरी एक दिवस ती माझी विनंती मान्य करेल आणि नक्षली मार्ग सोडून देईल अशी अपेक्षा वेट्टी रामाने व्यक्त केली आहे.