ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 29 - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री बनणार असल्याचं केव्हा कळलं याबाबत पहिल्यांदाच सार्वजनिक विधान केलं आहे. बुधवारी लखनऊमध्ये आयोजित 3 दिवसीय योग महोत्सवात योगी बोलत होते.
11 मार्चला उत्तर प्रदेशात बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा शोधण्यासाठी भाजपाला एका आठवड्याचा वेळ लागला होता. यादरम्यान मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत योगी आदित्यनाथ बरेच पिछाडीवर होते. मनोज सिन्हा, केशव प्रसाद मौर्य हे नेते यामध्ये आघाडीवर होते.
योगी म्हणाले, ''भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी तुम्ही मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहात असं मला एक दिवस आधी सांगितलं. त्यावेळी माझ्याकडे केवळ कपड्यांची एकच जोडी होती. मी काय करू काही समजत नव्हतं. जर नकार दिला असता तर मला पळपुटा म्हटलं गेलं असतं.आपण तर योगी आहोत, कपड्यांचं काय करायचंय'' असा विचार करून मी होकार दिला.
सूर्य नमस्कार आणि नमाजामध्ये साम्य-
यावेळी बोलताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सूर्य नमस्कार आणि नमाजामध्ये साम्य असल्याचं म्हटलं . सूर्य नमस्काराचे आसन आणि मुस्लिम बांधवांची नमाज पढण्याची प्रक्रिया मिळती जुळती आहे असं ते म्हणाले.
सूर्य नमस्काराचे आसन आणि मुस्लिम बांधवांच्या नमाज पढण्याच्या प्रक्रियेत साम्य आहे पण आतापर्यंत सत्तेत असलेल्यांनी सूर्य नमस्कार आणि नमाज यांना कधी जोडण्याचा प्रयत्न केला नाही. सत्तेत असलेल्यांना योग नाही तर 'भोग'ची सवय होती. यावेळी बोलताना आदित्यानाथांनी योगाचं महत्व सांगितलं. व्यायामामुळे फिटनेसचा फायदा होतो पण तो एका ठरावीक वेळेपर्यंतच. याउलट योग करणा-या व्यक्तीचं स्वास्थ्य शेवटपर्यंत उत्तम राहतं. योग करण्यासाठी कोणत्या जाती किंवा धर्माचं बंधन नसतं. काहीजण केवळ प्राणायमला योग मानतात पण योगा बसताना किंवा चालतानाही करता येतो असं ते म्हणाले. प्रत्येक व्यक्तीपर्यंत योगा पोहोचवण्याचं काम उत्तर प्रदेश सरकार करेल असं ते यावेळी म्हणाले.