नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडिया प्रचंड सक्रिय असतात, हे आपण अनेकदा पाहिले आहे. ट्विटरवरील सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्यांमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पोप फ्रान्सिस यांच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्या स्थानावर आहेत. दरम्यान, रविवारी ट्विटरवरील आपल्या चाहत्यांसोबत संवाद साधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना रिप्लाय देण्यास सुरुवात केली आहे. यानिमित्तानं पंतप्रधान मोदींची आपल्या चाहत्यांसोबत 'ट्विटर पे चर्चा' सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. सरकारविरोधी अविश्वास ठराव प्रस्ताव फेटाळण्यात आल्यानंतर सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. शुभेच्छांप्रमाणेच काही जणांनी त्यांना सल्लेदेखील देऊ केले आहेत. चाहत्यांनी दिलेल्या या सल्ल्यांची मोदींनी हसत मुखानं नोंद केली आहे.
शिल्पी अग्रवाल नावाच्या एका ट्विटर युजरनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थोडंसं आणखी हसण्याचा सल्ला दिला. या सल्ल्याला पंतप्रधान मोदींनी 'पॉईंट टेकन' असा स्माईलीसहित रिप्लाय दिला.
दरम्यान, त्यांनी गणेश शंकर नावाच्या ट्विटर युजरलाही रिप्लाय दिला आहे. गणेश शंकर यांनी असे पोस्ट केले होते की, अविश्वास प्रस्तावादरम्यान रात्री उशिरापर्यंत भाषण दिल्यानंतरही दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी शाहजहाँपूर येथे शेतकऱ्यांना संबोधित करताना दिसेल. 60-70 वय असतानाही तुमच्या चेहऱ्यावर थकवा जाणवत नाही. यावर उत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, 125 कोटी भारतीयांचा आशीर्वादाच माझी ताकद आहे आणि माझा संपूर्ण वेळ देशासाठीच आहे.