ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ५ - कुंदन शाह व सईद मिर्झा यांनी आपले पुरस्कार केल्याचे वृत्त आल्यानंतर चित्रपट निर्माता अशोक पंडीत यांनी राधाबाई चाळीला आग लावण्यात आली, ज्यामध्ये पाच महिला व एक मूल मरण पावलं त्यावेळी का नाही पुरस्कार परत केला असा सवाल केला आहे.
या वृत्ताने आपल्याला प्रचंड धक्का बसल्याचे सांगताना सर्जनशीलतेच्या क्षेत्रातील माझे गुरू कुंदन शाह व सईद मिर्झा आज उघडे पडल्याची टीकाही पंडीत यांनी केली आहे. समाजातल्या तळागाळातल्या असहाय्य लोकांवर चित्रपट व टिव्ही सीरीयल्स काढून शाह व मिर्झा यांनी करोडो रुपये कमावले असंही पंडीत यांनी िट्वटरवर म्हटलं आहे.
शाह व मिर्झा यांच्यासोबत मी खूप काळ काम केलं आहे, असं सांगताना काश्मिरी पंडीत असलेल्या अशोक पंडीत यांनी पंडीतांच्या वंशच्छेदाबाबत त्यांनी प्रतिक्रिया द्यावी अशी आपली अपेक्षा होती. मात्र, अनेकदा विनंती करूनही त्यांनी तशी प्रतिक्रिया दिली नसल्याचा दावाही पंडीत यांनी केला आहे.
अरुंधती रॉय या टेररिस्टसपोर्टर असून त्यांनी लायकी नसताना मिळालेला पुरस्कार परत केल्याची टिप्पणीही पंडीत यांनी केली आहे.
पुरस्कार वापसी आणि पुरस्कार वापसीला विरोध अशी दुफळी आता राजकारणाप्रमाणेच कलाक्षेत्रातही पडताना दिसत आहे. काँग्रेसच्या असहिष्णूताविरोधी मोर्टाला प्रत्युत्तर देताना अनुपम खेर यांनी ७ नोव्हेंबररोजी मोर्चा आयोजित केला असून पंडीत यांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.