पिंपरी (पुणे) - नाशिक फाटा येथील केंद्रीय रस्ते वाहतूक संस्थेत दोन आधुनिक व्हर्च्युअल रिॲलिटी सिम्युलेटर बसविले असून, केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी वाहन चालवण्याच्या आधुनिक प्रशिक्षणाचा लाभ घेतला. डोळ्यावर थ्रीडी व्हीआर घालून प्रशिक्षणाचा अनुभव घेतला. रस्ते अपघात रोखण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक संस्था (सीआयआरटी) काम करते. नाशिक फाटा भोसरी रस्त्यावरील या संस्थेस गडकरी यांनी सकाळी ११ वाजता भेट दिली. सुरुवातीला भारत न्यू कार असेसमेंट कंट्रोल सेंटरला त्यांनी भेट दिली. त्यानंतर रस्ते वाहतूक सुरक्षेच्या अनुषंगाने उपाययोजना केलेल्या एका वाहनातून प्रवास केला. वाहनाचे सारथ्य सचिव संकेत भोंडवे यांनी केले.
काय आहे उद्देश... देशातील सर्वाधिक अपघात मानवी चुकांमुळे होतात. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय त्यावर उपाययोजना करते. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांचे समुपदेशन आणि जनजागृती केली जाते. अपघात रोखण्यासाठी चालकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी भोसरीतील केंद्रात दोन सिम्युलेटर बसविले आहेत. चालकांना निरनिराळ्या वातावरणात, परिस्थितीत वाहन चालवताना येणारे अनुभव थ्रीडी इमेजिंगद्वारे घेता येणार आहेत. एकाच मशीनवर विविध वाहनांचे प्रशिक्षण, तसेच दिवसा आणि रात्री वाहन चालविण्याचा अनुभव थ्रीडी इमेजिंगद्वारे मिळणार आहे.