Punjab Election Results 2022 : पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल नुकतेच लागले. पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये पंजाब वगळता सर्व राज्यांमध्ये भाजपनं मुसंडी मारली. तर दुसरीकडे पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला (Aam Admi Party) बहुमत मिळालं आहे. पंजाबमध्ये यावेळी अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. पंजाबमधील पराभवानंचक आता काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा अंतर्गत कलह सुरू झाल्याचं दिसून येतंय. पराभवनंतर पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Siddhu) काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या निशाण्यावर आले आहेत. तर दुसरीकडे सिद्धूही आपल्या भूमिकांवर कायम आहेत. सिद्धूंनी यादरम्यान, चरणजीत सिंग चन्नी यांच्यावरही निशाणा साधला. तसंच कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यावरही निशाणा साधत त्यांना डाकू, लालची आणि ढोंग करत असल्याचं म्हटलं.
"जे लोक माझा अपमान करण्याचा प्रयत्न करत होते, त्या सर्व मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या व्यक्ती आम्हाला पाण्यात पाहत होत्या, आज तेच पाण्यात पडले," असं नवज्योत सिंग सिद्धू म्हणाले. तसंच पंजाबच्या जनतेनं नवा पर्याय शोधल्याबद्दल त्यांनी जनतेचं अभिनंदनही केलं. पंजाबमध्ये बदलाचं राजकारण होते आणि पंजाबच्या लोकांना मी शुभेच्छा देतो, असं ते म्हणाले.
सिद्धूंवर टीकायापूर्वी पंजाबच्या तीन मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर जोरदार टीका करत त्यांचा उल्लेख 'बेलगाम घोडा' असा केला होता. तसंच सिद्धू यांनी काँग्रेसचा पॉलिटिकल मर्डर केला असून काँग्रेसचंही खच्चीकरण केलं आहे. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी फार पूर्वीच चरणजीत सिंग चन्नी आणि काँग्रेस पक्षाच्या सरकारच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या सिद्धूंना बाहेरचा रस्ता दाखवायला हवा होता, अशी प्रतिक्रियाही तिन्ही मंत्र्यांनी दिली होती.
"नवज्योत सिंग सिद्धू हे आमचे अध्यक्ष आहेत, पण ते लगाम नसलेल्या घोड्याप्रमाणे आहेत. ना ते कोणासोबत जाऊ शकतात, ना ते आपल्यासोबत कोणाला ठेऊ शकतात. ते स्वत:ला वन मॅन आर्मी समजतात. आता पुढे काय करायचं याचा निर्णय पक्ष नेतृत्वाला घ्यायचा आहे," अशी प्रतिक्रिया माजी कॅबिनेट मंत्री तृप्त राजेंद्र सिंग बाजवा यांनी दिली. तर दुसरीकडे "आमच्या अध्यक्षांनी आपली वक्तव्य मर्यादेत केली पाहिजे," असं मत माजी कॅबिनेट मंत्री गुरकीत कोटली यांनी व्यक्त केलं.