कानपूर - उत्तर प्रदेशमच्या कानपूरमधील एका महिला अधिकाऱ्याचा फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल झालाय. या फोटोत महिला आयएएस अधिकारी सौम्या वृद्ध व्यक्तीसाठी रस्त्यावर खाली बसून संवाद साधताना दिसून येते. पीडित वृद्धांची अडचण जाणून घेण्याचा त्यांचा हा प्रयत्न सर्वांनाच आवडलाय. त्यामुळेच, सोशल मीडियातून IAS सौम्या पांडेय यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. सौम्या सध्या कानपूर ग्रामीणच्या सीडीओ म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
सौम्या ह्या महिला आणि मुलांच्या विकासासाठी कायम आग्रही असतात. त्यांच्या आजपर्यंतच्या कार्याची दखल घेत, त्यांना २०२० मध्ये बेस्ट कलेक्टरचा अवॉर्डही मिळाला आहे. लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी तळमळीचे प्रयत्न करणारी महिला अधिकारी म्हणून सध्या सौम्या यांची ओळख बनलीय.
ग्रामीण भागातून एक वृद्ध तक्रारदार शासन दरबारी आला होता. इलेक्ट्रॉनिक्स सायकलच्या मागणीसाठी हा वृद्ध सीडीओ कार्यालयात आला होता. त्याचवेळी, कार्यालयातून सीडीओ सौम्या यांनी वयोवृद्ध व्यक्तीला पाहिलं. रस्त्यावरुन फरफटत येणाऱ्या या वृद्धासाठी सौम्या यांनी कार्यालय सोडून थेट रस्त्यावर जाऊन त्यांची भेट घेतली. तसेच, वृद्ध व्यक्तीचा अडचण जाणून घेत कार्यवाही करण्याचे आश्वासनही दिले.
दरम्यान, सौम्या यांनी अभियांत्रिकीची पदवी घेतली असून इंजिनिअरींगच्या चौथ्या वर्षात असतानाच त्यांनी आयएएस बनण्याचे लक्ष निश्चित केले होते. विशेष म्हणजे त्यानुसार तयारी करुन पहिल्याच प्रयत्नात त्यांना यशही मिळालं. सन २०१६ मध्ये त्या आयएएसची परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांना मथुरा जिल्ह्यात उप जिल्हाधिकारी म्हणून पहिली पोस्टींग देण्यात आली होती. तर, मुलीच्या जन्मानंतर १४ व्या दिवशीच त्या ड्युटीवर रुजू झाल्या होत्या, त्यामुळेही त्यांच्या कर्तव्यदक्षेतची चर्चा झाली होती.