चेन्नई : दक्षिण भारतातील राजकारणामध्ये फिल्मी दुनियेतल्या लोकांचा वरचष्मा राहिलेला आहे. त्यामुळे तेथील नेत्यांच्या जीवनामध्येही नाट्यमय प्रसंग घडण्याची अनेकदा वेळ आलेली दिसते. कधी कधी राजकीय वैर आणि वैमनस्याने नेत्यांनी टोकाची पावले उचलल्याचेही तामिळनाडूतील लोकांनी पाहिले आहे. आपल्या आवडत्या नेत्याचे दर्शन होताच रस्त्याच्या दुतर्फा लोटांगणे घालणारे लोक असोत वा आपल्या आवडत्या नेत्याची तुरुंगातून सूटका व्हावी यासाठी प्रायश्चित्त म्हणून जमिनीवर अन्न वाढून जेवणारे लोकही याच राज्यामध्ये आहेत. विधानसभेत एकमेकांवर शब्दांबरोबर शारीरिक हल्ले करणे, मुख्यमंत्री झाल्यावर प्रतिस्पर्धी, विरोधीपक्षनेत्याला अटक करणे या तामिळनाडूतील अगदी नेहमीच्या घटना आहेत.
करुणानिधी यांच्या आयुष्यात मात्र अशीच एक घटना घडली होती. भारतीय राजकारणात सहसा अशा घटना घडत नाहीत. 30 जून 2001 रोजी मध्यरात्री 78 वर्षांच्या करुणानिधी यांना अटक करण्यासाठी चेन्नईमधील पोलीस त्यांच्या घरी गेले. करुणानिधी यांनी मुख्यमंत्रीपदावर असताना 10 उड्डाणपुलांची कामे देताना भ्रष्टाचार केला असा त्यांच्यावर आरोप ठेवून ही कारवाई केली जात होती. रात्री अचानक केलेल्या या कारवाईला विरोध करणाऱ्या करुणानिधी यांना आजिबात न जुमानता घराबाहेर अक्षरशः फरपटत नेण्यात आले होते. त्यानंतर वेपेरी पोलीस स्टेशनमध्ये थोडा वेळ बसल्यानंतर त्यांना मुख्य सत्र न्यायाधीश एस. अशोक कुमार यांच्यासमोर उभे करण्यात आले व कोठडी सुमावल्यानंतर चेन्नई मध्यवर्ती कारागृहात नेण्यात आले होते. याचवेळेस करुणानिधी यांचे पूत्र एम. के. स्टॅलिन चेन्नई शहराचे महापौर होते. अशा कारवाईचा सुकाणू त्यांच्या दिशेने येण्याआधीच स्टॅलिन यांनी न्यायाधीशांसमोर समर्पण केले होते. हे सर्व तामिळनाडूच्या तत्कालीन मुख्यमंत्री जे. जयललिता यांनी केल्याचा आरोप करुणानिधी व द्रमुकपक्षाने केला होता.
करुणानिधी यांनी यावेळेस अत्यंत संतप्त होऊन पत्रकारांसमोर आपल्यावर ओढवलेल्या प्रसंगाचे वर्णन केले होते. पोलिसांनी आपल्याला कोणतेही वॉरंट दाखवले नाही. वॉरंटची गरज नाही असे पोलिसांनी सांगितल्याचा त्यांनी पोलिसांवर आरोप केला होता. ''पोलिसांनी माझा शर्ट फाडला. जेव्हा आम्ही तिला (तत्कालीन मुख्यमंत्री जयललीता) अटक केली होती तेव्हा अत्यंत सन्मानाने वागवले होते'' असेही ते म्हणाले होते. करुणानिधी यांच्याबरोबर तत्कालीन केंद्रीय मंत्रिमंडळात व्यापार मंत्री असणारे मुरासोली मारन आणि पर्यावरण मंत्री टी. आर. बालू यांनाही अटक करण्यात आली होती. करुणानिधी यांच्या अटकेस विरोध करणार्या बालू व मारन यांनाही अशाच बळाचा वापर करुन अटक झाली. यानंतर चेन्नईतील वातावरण चांगलेच बिघ़डले आणि द्रमुक व राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सदस्यपक्षांनी बंद पाळला होता.