नवी दिल्ली : लोकसभेच्या सुरू असलेल्या अधिवेशनात आज एक वेगळाच किस्सा घडला आहे. लोकसभेच्या अध्यक्षांनाच ते शिकलेले आहेत असे सांगावे लागले आहे.
आपचे खासदार भगवंत मान यांनी लोकसभेमध्ये दुसऱ्या देशांमधील भारतीय दुतावासांतील भारतीयांना कोणत्या समस्या आहेत, याबाबत बोलण्यास सुरूवात केली. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मान यांना बसण्यास सांगितले. त्यांनी सांगितले की, शून्य प्रहरामध्ये जर तुम्ही विषय बदलणार असाल तर आधी माझी परवानगी घ्यावी लागेल. तुम्हाला पंजाबमधील शिक्षकांच्या पगाराबाबत बोलण्यासाठी विषय दिला होता. मी शिकलेला अध्यक्ष आहे. जर कोणी खासदार शून्य प्रहरात विषय बदलत असेल तर माझी परवानगी घ्यावी.
यानंतर मान यांनी पुन्हा उभे राहत अध्यक्षांकडे परवानगी मागितली. बिर्ला यांनी परवानगी दिली. बिर्ला यांनी आज सलग साडेतीन तास बसून कामकाज पाहिले. यासाठी त्यांना खासदारांनी शाबासकीही दिली. त्यांनी नवीन सदस्यांसह जास्तीत जास्त खासदारांना बोलण्याची संधी दिली आहे.
संसदेत दोन्ही सभागृहांमध्ये प्रश्नोत्तराच्या तासानंतर लगेचच शून्य प्रहराची वेळ असते. हा वेळ 12 पासून 1 वाजेपर्यंत असतो. दुपारी 12 वाजता सुरु झाल्याने यास शून्य प्रहर म्हटले जाते. शून्य प्रहराची सुरूवात 1960 च्या दशकात झाली. यामध्ये पूर्वसूचना न दिलेले पण उशिर न करण्यासारखे महत्वाचे विषय चर्चेस घेतले जातात. हे विषय दहा दिवसांच्या आगाऊ सूचनेशिवाय मांडले जातात. हे अधिवेशन 26 जुलैपर्यंत चालणार आहे.