नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल कांग्रेसच्या अध्यक्ष आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यातील राजकीय वाद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आता थेट एकमेकांचे पक्ष कार्यालय त्याब्यात घेण्यासाठी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मारामारीवर उतरले आहेत. तृणमूल कांग्रेसच्या कार्यालयावर भाजपने आपले कार्यालय थाटले असल्याचा दावा तृणमूल कांग्रेसकडून करण्यात येत आहे. शुक्रवारी ममता बॅनर्जी यांनी भाजपचे कार्यालायचे कुलूप तोडून आपल्या त्याब्यात घेत, तिथे आपल्या पक्षाचे कार्यालय सुरु केलं. उत्तर २४ परगना येथील ही घटना आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजप आणि तृणमूल कॉंग्रेस यांच्यातील राजकीय युद्ध व हिंसाचाराच्या घटनेने पश्चिम बंगाल चर्चेत आले होते. निवडणुका संपल्यानंतर ही येथील राजकीय युद्ध थांबताना दिसत नाही. आता तर दोन्ही पक्षातील कार्यकर्ते एकेमेकांचे पक्ष कार्यालायचा ताबा मिळवण्यासाठी हाणामारीवर उतरले असल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत. त्यातच, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी उत्तर 24 परगना येथील भाजपच्या कार्यालयाचे कुलूप तोडून आपल्या त्याब्यात घेतले. भाजपच्या कार्यालयवरील भाजपचे चिन्ह आणि भगवा कलर मिटवण्याचे आदेश दिले. त्यांनतर त्यांनी स्वतः आपल्या पक्षाचे चिन्ह काढत भाजपच्या त्या कार्यालयाला आपल्या पक्षाचे नाव दिले.
दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये 'जय श्री राम' ह्या घोषणांमुळे राजकीय वातावरण तापत असताना पहायला मिळत आहे.'जय श्री राम'च्या घोषणा देणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भडकल्या असल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर, आता, त्याला उत्तर देत भाजपकडून 'जय श्री राम' लिहलेले 10 लाख पोस्टकार्ड ममतांना पाठवले जाणार आहेत. तर, ममता बॅनर्जी यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे, असा टोला भाजपकडून लगावण्यात आला आहे.
भाजप आणि ममता यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. पश्चिम बंगालमधील अमित शहां यांच्या रोड शो मध्ये झालेल्या राड्यानंतर हे वाद अधिकच पेटले होते. त्यामुळे येणाऱ्या काळात हे राजकीय युद्ध अधिकच पेटणार असल्याचे दिसत आहे.