वाराणशी : धाब्यावर जेवन करीत असताना ताटात अचानक नरेंद्र मोदींचे नाव असलेली पोळी दिसताच बसपा आमदाराचा पारा चढला आणि त्याने धाबा मालकाला धारेवर धरले. मंगळवारी दुपारी वाराणशीतील यादव धाब्यावर हे संताप नाट्य घडले. मालकाने दुसरी पोळी दिल्यानंतरच बसपा आमदाराने नंतर जेवन सुरु केले. या प्रकाराची वार्ता वार्यासारखी पोहोचताच पोलिस तिथे पोहोचले आणि त्यांनी या पोळ्या ग्राहकांना देण्यास बंदी घातली. त्याचे झाले असे की, नरेंद्र मोदी यांची ‘मिशन २७२’ची एक चमू सध्या वाराणशीत तळ ठोकून आहे. या चमूचे विदर्भाचे प्रमुख अरविंद देठे (अकोला) गुरूदिपसिंग (दिल्ली), प्रमोद सिंग (बिलासपूर) यांनी पोळ्या तयार करणारे एक यंत्र इथे आणले आहे. या मशीनमधून तयार होणार्या पोळीवर ‘अबकी बार मोदी सरकार’असे प्रिन्ट होते. येथील यादव धाब्याच्या मालकाने ‘मिशन २७२’चमूकडून हे मशीन विकत घेतले आहे. आज दुपारी इथे झांशी येथील बसपाचे आमदार सीताराम कुशवाह जेवायला आले. आमदार महोदयांनी जेवायला सुरुवात केल्यानंतर या ‘मोदी ब्रान्ड पोळी’चे ब्रान्डींग करण्यासाठी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना बोलावण्यात आले. त्यात इलेक्ट्रॉनिक चॅनेलचे प्रतिनिधीसुद्धा होते. धाब्यावर अचानक झालेली गर्दी पाहून आमदार कुशवाह काहीसे गडबडले. चॅनेलच्या कॅमेर्याचा झोत त्यांच्या ताटातील पोळीवर पडताच कुशवाह भडकले. पण तोपर्यंत त्यांच्या दोन-तीन पोळ्या खावून झाल्या होत्या. ते कसनुुसे करु लागले. घास तोंडातच फिरवित ‘अल्पसंख्यकांच्या तोंडातला घास पळविणार्या मोदीची पोळी मी कशी खाणार’असे म्हणत त्यांनी धाबा मालकाची खरडपट्टी काढायला सुरुवात केली. शेवटी दुसरी पोळी दिल्यानंतर ते शांत झाले आणि त्यांनी जेवण आटोपले. पण काही क्षणासाठी धाब्यावरची भट्टी आणि आमदाराचे डोके जाम भडकले होते. (विशेष प्रतिनिधी)
‘मोदी रोटी’ दिसताच बसपा आमदाराचा घास अडकला
By admin | Published: May 07, 2014 8:48 AM