नवी दिल्ली - अठरा वर्षांच्या कठोर मेहनतीतून छोट्या आकाराचे विमान तयार करणारे कॅप्टन अमोल यादव यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. दिल्ली येथील निवासस्थानी पंतप्रधानांनी अमोल यादव यांना आमंत्रित करून प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे.
कॅप्टन अमोल यांनी घराच्या माडीवर पडलेल्या टाकाऊ वस्तूंपासून सहा आसनांचे प्रायोगिक विमान तयार केले आहे. त्यावर पंतप्रधान म्हणतात, ‘एखादे उद्दिष्ट्य गाठण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या लाखो तरुणांना प्रेरणा देणारी अमोल यांची कहाणी आहे. स्वदेशी विमानाची निर्मिती करणे अमोल यांना धैर्य आणि दृढ संकल्पामुळेच शक्य झाले आहे. घराच्या माडीवर पडलेल्या टाकाऊ वस्तूंचा वापर केल्यामुळे हे ‘मेक इन इंडिया’चे उत्तम उदाहरण आहे.’ पीएमओने सोमवारी (21 ऑक्टोबर) ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.
अमोल यांना 2011 पासून नागरी उड्डयण संचालनालयाकडून विमानासाठी परवानगी घेण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता, हे विशेष. याबाबतीत माहिती मिळाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना याबाबत सविस्तर सांगितले. त्यानंतर कॅप्टन अमोल यांना तातडीने परवानगी देण्याचे आदेश पंतप्रधान कार्यालयातून संचालनालयाला देण्यात आले. अमोल यादव यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. दिल्ली हे विमान उडविण्याची मंजुरी अमोल यांना अगदी तीन दिवसांपूर्वीच मिळाली आहे. अमोल यांनी या मदतीसाठी देखील मोदींचे आभार मानले.
अमोल यादव यांना पहिले उड्डाण दहा तासांपर्यंत आणि दहा हजार कोटी फुटापेक्षा कमी उंचीवर करावे लागणार आहे. अमोल काही दिवसांपूर्वी जेट एअरवेजमध्ये वरिष्ठ कमांडर होते. अमोल यांचा संघर्ष अठरा वर्षांचा असला तरीही प्रत्यक्ष विमान तयार करण्यासाठी त्यांना सहा वर्ष लागले आहेत. 2016 मध्ये मुंबईतील ‘मेक इन इंडिया’मध्येही त्यांनी विमानाचे मॉडेल सादर केले होते. आता अमोल यांना परीक्षण करण्यापूर्वी पंधरा दिवसांच्या अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे. त्यानंतरच त्याला संचालनालयाकडून ‘एअरवर्थनेस’ प्रमाणपत्र दिले जाईल. पहिल्या परीक्षणाच्या वेळी हिंदुस्थान एरोनॉटिक्सचे विंग कमांडर लगनजीत बिस्वाल निरीक्षण करणार आहेत. यावेळी एक पर्यवेक्षकही सोबत असणार आहे.