Venkaiah Naidu Pm Narendra Modi: राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांना सोमवारी संसदेत निरोप देण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निरोप घेत नायडू यांच्या कार्यकाळातीत आठवणींना उजाळा दिला. पंतप्रधान म्हणाले की, सभागृहासाठी हे खूप भावनिक क्षण आहेत. या सभागृहाचे नेतृत्व करण्याची तुमची जबाबदारी तुम्ही योग्य प्रकारे पार पाडलीत. आताही जबाबदारी म्हणून निरोप घेत असाल तरी तुमच्या अनुभवांचा लाभ आम्हाला भविष्यात दीर्घकाळ मिळत राहील अशी आशा आहे. याच वेळी व्यंकय्या नायडू यांनीही निरोप समारंभाच्या औचित्याने या कार्यक्रमात एक किस्सा सांगितला.
पंतप्रधान मोदींचा तो फोन आला अन्...
व्यंकय्या नायडू म्हणाले की, मी माझ्या आयुष्यात कधीही कोणाच्या पाया पडलो नाही. त्यांनी ५ वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोन कॉलची आठवण सांगितली. जेव्हा पक्षाने नायडू यांची उपराष्ट्रपती म्हणून निवड केली होती त्यावेळची ही गोष्ट होती. नायडू म्हणाले की, ज्या दिवशी पंतप्रधान मोदींनी फोन करून सांगितले की माझी उपराष्ट्रपती पदी निवड होत आहे, तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आलं. मला रडू फुटलं त्याचं कारण मला फार वाईट वाटत होतं. आणि वाईट एकाच गोष्टीचं वाटत होतं ते म्हणजे मला माझा पक्ष सोडावा लागणार होता आणि म्हणूनच मी दु:खी झालो होतो.
व्यंकय्या नायडू म्हणाले की, लोकशाहीमध्ये बहुमत नेहमीच असते. परंतु विरोधकांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे आणि सरकारने त्यांना पुढे येऊ दिले पाहिजे. लोकशाहीत शेवटी बहुमत निर्णय घेते. राजकारणात कधीही शॉर्टकट नसतात. तुम्हाला संयम आणि कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे. लोकांपर्यंत जा, त्यांना जागरूक करा आणि इतरांचे म्हणणे ऐका. तुष्टीकरण करू नका, त्याउलट सर्वांचाच आदर करा, असा मोलाचा सल्ला त्यांनी साऱ्यांना दिला.
"मी माझी जबाबदारी सांभाळण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. मी दक्षिण, उत्तर, पूर्व, पश्चिम, ईशान्य अशा सर्व पैलूंना सामावून घेण्याचा आणि संधी देण्याचा प्रयत्न केला. तुमच्यापैकी प्रत्येकाला वेळ दिला. आमच्यावर वरिष्ठ सभागृहाची मोठी जबाबदारी आहे. संपूर्ण जग पाहत असते. भारत पुढे जात आहे. त्यामुळे मी राज्यसभेच्या खासदारांना आवाहन करतो की त्यांनी सदाचार, प्रतिष्ठा आणि शिष्टाचार राखावे, जेणेकरून सभागृहाची प्रतिमा आणि प्रतिष्ठा कायम राखली जाईल", असे व्यंकय्या नायडू यांनी जाता-जाता सांगितले.