संपूर्ण देश सैन्यासोबत उभा; तुम्ही चीनविरोधात कधी उभे राहणार? राहुल गांधींचा मोदींना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 07:03 PM2020-09-15T19:03:10+5:302020-09-15T19:05:35+5:30
चिनी अतिक्रमणाच्या विषयावरून मोदींकडून देशाची दिशाभूल; राहुल गांधींचा आरोप
नवी दिल्ली: संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज लोकसभेत चीनसोबत सुरू असलेल्या सीमावादाची माहिती दिली. पूर्व लडाखमधील तणाव, चीनकडून सुरू असलेले घुसखोरीचे प्रयत्न याची माहिती सिंह यांनी लोकसभेच्या माध्यमातून देशाला दिली. यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं. 'चीनकडून करण्यात आलेल्या अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदींनी देशाची दिशाभूल केल्याचं संरक्षणमंत्र्यांच्या विधानावरून स्पष्ट झालं आहे,' अशा शब्दांत राहुल यांनी मोदींवर थेट निशाणा साधला.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांनी चीनला फटकारलं; लडाख सीमेवरील संपूर्ण स्थिती लोकसभेत मांडली
'मोदींनी चीनच्या अतिक्रमणावरून देशाची दिशाभूल केल्याचं संरक्षणमंत्र्यांच्या विधानावरून स्पष्ट झालं आहे. आपला देश कायम सैन्यासोबत उभा होता, आहे आणि राहील,' असं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. तुम्ही चीनविरोधात कधी उभे राहणार आणि चीनकडून आपली जमीन कधी परत घेणार? असे सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत.
रक्षामंत्री के बयान से साफ़ है कि मोदी जी ने देश को चीनी अतिक्रमण पर गुमराह किया।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 15, 2020
हमारा देश हमेशा से भारतीय सेना के साथ खड़ा था, है और रहेगा।
लेकिन मोदी जी,
आप कब चीन के ख़िलाफ़ खड़े होंगे?
चीन से हमारे देश की ज़मीन कब वापस लेंगे?
चीन का नाम लेने से डरो मत।
काँग्रेस प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनीदेखील ट्विटवरून पंतप्रधान मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यावर हल्ला चढवला. 'राजनाथजी, देश सैन्यासोबत एकजुटीनं उभा आहे. पण चीननं आपल्या जमिनीवर कब्जा करण्याचं धाडस केलंच कसं, याचं उत्तर द्या. मोदींनी चिनी घुसखोरीबद्दल दिशाभूल का केली? चीनला आपल्या जमिनीवरून कधी पळवून लावणार?,' असा सवाल त्यांनी विचारला.
मा. राजनाथ जी,
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) September 15, 2020
देश सेना के साथ एकजुट है। पर ये बताएँ-
चीन ने हमारी सरज़मीं पर क़ब्ज़े का दुस्साहस कैसे किया?
मोदीजी ने चीन द्वारा हमारे क्षेत्र में घुसपैठ न करने बारे गुमराह क्यों किया?
चीन को हमारी सरज़मीं से वापस कब ख़देड़ेंगे?
चीन को लाल आँख कब दिखाएँगे?
पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी संरक्षणमंत्र्यांनी सीमेवरील तणावाची माहिती लोकसभेला दिली. यानंतर काँग्रेस खासदारांनी चर्चेची मागणी करत सभात्याग केला. काँग्रेस खासदारांना राजनाथ सिंह यांना प्रश्न विचारायचे होते. मात्र लोकसभा अध्यक्षांनी परवानगी नाकारली. त्यामुळे काँग्रेस खासदारांनी सभात्याग केला. प्रमुख विषयांवर चर्चा करण्याची सदनाची परंपरा आहे. मात्र सरकारला प्रश्नांची भीती वाटते, अशा शब्दांत काँग्रेसनं मोदी सरकारवर निशाणा साधला.
काय म्हणाले संरक्षणमंत्री राजनाथ सिंह?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाखला जाऊन सैनिकांची भेट घेतली. देश शूर सैनिकांच्या मागे उभा आहे असा संदेशही त्यांनी दिला होता. मीसुद्धा लडाखला गेलो, सैनिकांचे धैर्य, शौर्य आणि धाडस याचा प्रत्यय आला. कर्नल संतोषने मातृभूमीचे रक्षण करताना सर्वोच्च बलिदान दिले असं राजनाथ सिंह म्हणाले.
चीनशी युद्ध झाल्यास शिया मुसलमान भारतासाठी प्राण देण्यासही तयार; धर्मगुरुचं पंतप्रधानांना पत्र
पारंपारिक सीमेबद्दल दोन्ही देशांचे वेगवेगळे अर्थ आहेत असा चीनचा दावा आहे. १९५०-६० च्या दशकात हे दोन्ही देश याबद्दल बोलत होते पण कोणताही तोडगा निघाला नाही. चीनने लडाखमधील काही जमीन फार पूर्वी ताब्यात घेतली होती, त्याव्यतिरिक्त पाकिस्तानने पीओकेमधील काही जमीनही चीनच्या ताब्यात दिली. ही एक मोठी समस्या आहे आणि त्याचे निराकरण शांततेने व वाटाघाटीने करायला हवे. सीमेवर शांतता राखणे महत्वाचे आहे. सध्या एलएसीसंदर्भात दोन्ही देशांचे वेगळे मत आहे. शांतता कायम ठेवण्यासाठी दोन्ही देशांमध्ये करार झाले आहेत. १९८८ पासून दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधात विकास झाला. द्विपक्षीय संबंधही विकसित होऊ शकतात आणि सीमादेखील तोडगा निघू शकतो, असा विश्वास भारताला आहे. तथापि, त्याचा द्विपक्षीय संबंधांवरही परिणाम होऊ शकतो असं ते म्हणाले.