आदेश रावल -
नवी दिल्ली : संसदेत आज एक वेगळे चित्र पाहायला मिळाले ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड ज्या पद्धतीने बोलले त्यामुळे संतप्त झालेल्या समाजवादी पक्षाच्या जया बच्चन यांनी प्रसारमाध्यमांना संबोधित केले तेव्हा त्यांच्या पाठीशी काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी अतिशय भक्कमपणे उभ्या असल्याचे दिसले.
विरोधी ऐक्याचा हा संदेश केवळ ‘इंडिया’ आघाडीपुरता मर्यादित राहिला नाही तर गांधी आणि बच्चन कुटुंबातील जुन्या संबंधांनाही नवा उजाळा मिळाला. जया बच्चन पत्रकार परिषदेत म्हणाल्या की, सभापती आमच्याशी ज्या प्रकारे वागतात ते अत्यंत धक्कादायक आणि निराशाजनक आहे. आम्ही सर्व सहकारी आहोत. भले ते राज्यसभेच्या सभापतीपदाच्या खुर्चीवर बसले असतील. धनखड यांनी त्यांच्या वर्तनाबद्दल माफी मागितली पाहिजे.
राज्यसभेत नेमके काय झाले?- सभागृहातील शून्य तास संपण्यापूर्वी आणि प्रश्नोत्तराचा तास सुरू होण्यापूर्वी एका मुद्यावर धनखड यांनी जया बच्चन यांना बोलण्याची परवानगी दिली. त्यावेळी त्यांनी ‘जया अमिताभ बच्चन’ असा उल्लेख केला. - त्यावर त्या म्हणाल्या, मला, ‘जया अमिताभ बच्चन’ असे संबोधू नका. मी एक कलाकार आहे, मला देहबोली समजते, मला भाव समजतात. सर, मला माफ करा; पण तुमचा टोन मला मान्य नाही. तुम्ही सभापतीपदी बसले असला तरी आपण सर्व सहकारी आहोत. - सभापती त्यावर म्हणाले, ‘जयाजी, तुम्ही खूप प्रसिद्धी मिळवली आहे. अभिनेता दिग्दर्शकाप्रमाणे काम करतो हे तुम्हाला माहिती आहे. तुम्ही कोण आहात हे महत्त्वाचे नाही, तुम्ही सेलिब्रिटी असलात, तरीही तुम्हाला नियम समजून घेणे आवश्यक आहे.’
विरोधकांच्या सभात्यागानंतर धनखड म्हणाले, ज्या पद्धतीने विरोधकांनी माझ्याविरोधात मीडियात वक्तव्ये केली आहेत, त्यामुळे मी दुखावलो आहे. असे करून विरोधी पक्षांचे नेते लोकशाही कमजोर करण्याचा प्रयत्न करीत आहेत.