नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालया कुक म्हणून काम करणाऱ्या अजय कुमार सामल यांच्या मुलीने अमेरिकेतील विद्यापीठाकडून तब्बल ४१ लाख रुपयांची शिष्यवृत्ती मिळवली आहे. अमेरिकेत प्रज्ञा आता कायद्याचं पुढील शिक्षण घेणार आहे. त्यामुळे, या मुलीच्या कौतुकानिमित्त तिचं अभिनंदन करण्यासाठी सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशांना बोलावलं होतं. यावेळी, सर्वांच्या उपस्थितीत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी प्रज्ञाचं तिच्या वडिलांसमोर अभिनंदन व कौतुक केलं. विशेष म्हणजे यावेळी, प्रज्ञासाठी सर्वच न्यायाधीशांनी स्टँडीग ओव्हेशन दिलं.
सुप्रीम कोर्टातील एका न्यायाधीशांच्या घरी कुक असलेल्या अजय कुमार सामल यांची कन्या प्रज्ञा हिने दैदिप्यमान यश मिळवलं आहे. वडिल व आजूबाजूला असलेल्या वातावरणामुळे प्रज्ञाने विधी पदवीचं शिक्षण घेतलं. त्यानंतर, सुप्रीम कोर्टाच्या रीसर्च आणि प्लॅनिंग सेंटरमध्ये विधी संशोधक म्हणून तिला काम करण्याची संधी मिळाली. त्या अनुभवावर आणि स्वत:च्या हुशारीमुळे ती विधी क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षणासाठी अमेरिकेतील सहा विद्यापीठात पात्र ठरली आहे. कोलंबिया, पेनिंसिल्व्हनिया, शिकागो, न्यूयॉर्क, बरकले आणि मिशिगन या विद्यापीठाकडून तिला पदव्युत्तर शिक्षणाची संधी मिळली आहे.
विशेष म्हणजे येथील मिशिगन विद्यापीठाने तिला वार्षिक ५० हजार डॉलरची शिष्यवृत्तीसुद्धा देऊ केली आहे. भारतीय चलनानुसार ही रक्कम ४१ लाख रुपये एवढी होते. आता, लवकरच या ६ पैकी एक विद्यापीठ निवडून ती अमेरिकेत पदव्युत्तर शिक्षणासाठी जात आहे. त्यामुळे, सरन्यायाधीशांनी सर्वोच्च न्यायालयातील इतर न्यायमूर्तींसह प्रज्ञाचा सन्मान केला.
प्रज्ञाने आपल्या स्वकर्तृत्वाने आणि जिद्दीने हे यश मिळवलं आहे. तिच्या पुढील यशप्राप्तीसाठी आपण सर्वजण तिच्या सोबत आहोत, तिला हवं ते यश प्राप्त होवो, असे सरन्यायाधीस चंद्रचूड यांनी म्हटलं. तसेच, प्रज्ञा आता १४० कोटी भारतीयाचं स्वप्न स्वत:च्या खांद्यावर घेऊन जात आहे. अमेरिकेतील शिक्षणानंतंर देशाची सेवा करण्यासाठी ती पुन्हा मायदेशी येईल, अशी अपेक्षाही चंद्रचूड यांनी व्यक्त केली. यावेळी प्रज्ञाला भारतीय संविधान संबंधित तीन पुस्तकेही भेट देण्यात आली.
दरम्यान, सरन्यायाधीश चंद्रचूड हे माझ्यासाठी प्रेरणास्थान आहेत. देशातील तरुण वकिलांना ते नेहमीच प्रोत्साहन देतात, त्यांचे शब्द मोत्यांप्रमाणे आहेत, असे प्रज्ञाने यावेळी म्हटले.