हैदराबाद : 'सरकारी काम अन् दहा तास थांब' असे नेहमी बोलले जाते. याचा प्रत्यय अनेकदा आला आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे जनता किती त्रस्त आहे हे अनेकदा आंदोलनांच्या आक्रोशातून दिसले आहे. वरिष्ठांकडे तक्रार केली तरी परिस्थिती 'जैसे थे'च असते. सरकारी अधिकाऱ्यांच्या या हलगर्जीपणाला वैतागलेल्या एका व्यक्तीने जे काही केलं ते पाहून अनेकांना धक्का बसला. खरं तर तेलंगणातीलहैदराबाद येथे एका संतप्त व्यक्तीने अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे त्यांच्या कार्यालयात चक्क साप सोडला.
दरम्यान, सध्या देशातील विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस होत आहे. राजधानी दिल्लीत तर ओल्या दुष्काळाचे सावट होते. हैदराबाद शहरात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून पूरसदृश स्थिती आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने नागरिक संतप्त आहेत. अशातच हैदराबाद येथील अलवाल इथे एका व्यक्तीच्या घरात साप शिरला असता त्याने महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. पण, सहा तास उलटून गेले तरी कारवाई न झाल्याने संतप्त नागरिकाने अधिकाऱ्यांना धडा शिकवण्याचे ठरवले.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कानाडोळा केल्याचे निदर्शनास येताच संबंधित व्यक्तीने साप स्वत: पकडून वॉर्ड ऑफिसमध्ये नेला. लक्षणीय बाब म्हणजे ऑफिसमध्ये जाऊन त्याने तो साप अधिकाऱ्यांच्या टेबलावर सोडला. अधिकाऱ्यांनी व्यक्तीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने स्थानिक भाजपा नेते विक्रम गौर यांनी घटनेचा व्हिडीओ शेअर करत आवाज उठवला. "संबंधित व्यक्ती किती असहाय्य झाली असेल याची कल्पना करा. हैदराबादच्या अलवाल येथील जीएचएमसी वॉर्ड ऑफिसमधील हा प्रकार असून त्या व्यक्तीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आले असता त्याने कार्यालयात साप सोडला", असे त्यांनी म्हटले.