बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यामधील कसबा येथे आरोपीला पकडण्यासाठी पोलीस एका घरात घुसल्याने मोठा वाद झाला. एवढंच नाही तर आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या दिल्ली पोलिसांच्या पथकाला स्थानिकांनी कोंडून ठेवले. या गोंधळाची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि प्रतिनिधी घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर जदिल्ली पोलिसांच्या पथकाने लेखी माफीनामा दिल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांची मुक्तता केली.
या घटनेनंतर पीडित महिला सोनी देवी हिने सांगितले की, दिल्ली पोलिसांचं एक पथक बलात्काराच्या गुन्ह्यातील एक आरोपी विक्की ठाकूर याला पकडण्यासाठी कसबा येथे आले होते. मात्र ते विक्की ठाकूरऐवजी माझे पती कृष्णा चौधरी यांच्या घरात घुसले. आमच्या घरातील बेडरूममध्ये घुसून पोलिसांनी माझ्या पतीला फरफटत नेण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार घडला तेव्हा मी पतीसोबत बेडरूममध्येच होते. दिल्ली पोलिसांचे पाच कर्मचारी ही कारवाई करण्यासाठी आले होते, अशी माहितीही तिने दिली.
सोनी देवी हिने सांगितले की, पतीला ताब्यात घेण्याचं कारण काय, असं आम्ही विचारलं, तेव्हा पोलिसांनी याच्यावर बलात्काराचा आरोप आहे, असं सांगितलं. आम्ही जेव्हा वॉरंट मागितलं, तेव्हा पोलिसांनी वॉरंटचे कागद दाखवले नाहीत. त्यानंतर त्यांनी आम्ही विक्की ठाकूरला अटक करण्यासाठी आलो आहोत, असे सांगितले. त्यानंतर येथील ग्रामस्थांनी मिळून दिल्ली पोलिसांना घेरून कोंडून ठेवले.
ही माहिती मिळताच कसबा ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. स्थानिक लोकसप्रतिनिधी गोपाल यादव यांनी समजूत घातल्यानंतर दिल्ली पोलिसांनी माफीनामा लिहून दिला. त्यानंतर ग्रामस्थांनी या पोलिसांनी मुक्तता केली. या घटनेबाबत पूर्णियाचे एसपी उपेंद्रनाथ वर्मा यांनी सांगितले की, दिल्ली पोलिसांचं पथक उपेंद्रनाथ वर्मा यांनी सांगितले की, दिल्ली पोलिसांचं पथक चुकीच्या घरात घुसले. मात्र स्थानिकांच्या मदतीने खऱ्या आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. मात्र यादरम्यान झालेल्या गैरसमजामुळे काही काळ दिल्ली पोलिसांना कोंडून ठेवण्यात आले.