रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी जगाची पर्वा न करता युक्रेनवर संपूर्ण ताकदीनिशी हल्ला चढवला आहे. पाश्चिमात्य देशांकडून निर्बंध घातले जात आहेत आणि निषेधही केला जात आहे. मात्र, तरीही रशिया आपल्या भूमिकेवर कायम आहे. आता भारतातही रशियाचे अनुकरण करण्याची आणि रशियाच्या पावलावर पाऊल टाकण्याची मागणी होत आहे.
सोशल मीडियावर लोक भारत सरकारकडे रशियाचे अनुकरण करण्याची मागणी करत आहेत. ज्या पद्धतीने रशिया अखंड सोव्हिएत संघ बनविण्याच्या दिशेने प्रयत्न करत आहे, त्याच पद्धतीने आम्हालाही अखंड भारत हवा आहे, अशी मागणी लोक करत आहेत. पण लोकांचे म्हणणे अक्साई चीन आणि पीओकेसंदर्भात आहे.
ज्या पद्धतीने पुतिन युक्रेन परत मिळवण्यासाठी जोर लावत आहेत, त्याच पद्धतीने आता भारतातही अखंड भारतची मागणी जोर धरू लागली आहे. लाखो लोक सोशल मीडियाच्या माध्यमाने, आम्हालाही रशियाप्रमाणे अखंड भारत हवा आहे, अशी मागणी करताना दिसत आहेत. "राष्ट्रपति पुतिन यांनी, कशा प्रकारे पुन्हा एकदा अखंड रशिया होऊ शकतो, हे दाखविले आहे... आपणही अखंड भारताची आशा सोडू नये," असे ट्विट भाजप नेते शिवराज सिंग दाबी यांनी केले आहे.
अखंड भारत म्हणताना लोकांचे म्हणणे अक्साई चीन आणि पीओकेसंदर्भात आहे. अक्साई चीनवरून भारत आणि चीनचा वाद आहे. तर पीओके म्हणजे पाकिस्तानने बळकावलेला भारताचा भाग आहे.