नवी दिल्ली - माजी केंद्रीयमंत्री आणि डीएमके खासदार दयानिधी मारन यांना विमानप्रवासात आश्चर्याचा धक्का बसला. दिल्लीहून चेन्नईला जाण्यासाठी मारन यांनी इंडिगोची विमानसेवा घेतली होती. त्यासाठी, जेव्हा ते विमानात बसले तेव्हा सहकारी खासदाराल पाहून ते अवाक झाले. खासदार मारन यांनी या विमानप्रवासाचा अनुभव आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. तसेच, हा प्रवास अतिशय मजेशीर झाल्याचंही त्यांनी म्हटलं.
मी संसदीय समितीच्या बैठकीसाठी दिल्लीत आलो होतो, या बैठीकनंतर मी चेन्नईसाठी इंडिगोच्या विमानाने प्रवासाला निघालो. मी पहिल्याच रांगेत बसलो आणि क्रु मेंबरने बोर्डींग पूर्ण झाल्याची घोषणा केली. त्याचवेळी विमान पायलट (कॅप्टन) च्या ड्रेसमधील एका व्यक्तीने मला विचारले, आपणही याच फ्लाईटने प्रवास करत आहात?. प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीने तोंडावर मास्क परिधान केला होता, त्यामुळे मी त्यांना ओळखू शकलो नाही. मात्र, ज्यावेळी त्यांनी मास्क काढले तेव्हा खासदार दयानिधी मारन आश्चर्यचकित झाले. कारण, या विमानाचे वैमानिक (पायलट) दुसरे-तिसरे कोणी नसून त्यांचे सहकारी मित्र खासदार राजीव प्रताप रुडी हेच होते.
विशेष म्हणजे 2 तासांपूर्वीच आपण संसदीय समितीच्या बैठकीत याच खासदारांसोबत होतो. मात्र, दोन तासांतच खासदार ते विमान पायलट असा बदलता प्रवास करणाऱ्या राजीव प्रताप रुडींना पाहून मला माझ्याच डोळ्यावर विश्वास बसेना. त्यामुळेच, माझा हा विमानप्रवास संस्मरणीय ठरल्याच मारन यांनी सांगितलं. कॅप्टन.. आम्हाला दिल्लीतून चेन्नईपर्यंत सुखरुप पोहोचविण्यासाठी धन्यवाद.. असे म्हणत त्यांनी आभार व्यक्त केले.
राजीव प्रताप रुडी हे एअरबस A320-321 चे उड्डाण करत होते. ते 2003 साली नागरी उड्डाणमंत्रीही होते. विशेष म्हणजे 27 वर्षांचे असतानाच ते बिहारच्या तरैय्या विधानसभा मतदारसंघातून आमदार बनले होते. सध्या ते भाजपाकडून छपरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार असून ते कमर्शियल पायलट आहेत.