लेह (लडाख) - संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काश्मीर प्रश्नावरून पाकिस्तानला पुन्हा एकदा खडेबोल सुनावले आहेत. काश्मीर हा नेहमी भारताचा भाग राहिलेले आहे. काश्मीर पाकिस्तानचा भाग होतेच कधी? पाकिस्तानचा काश्मीरवर काहीही हक्क नाही, असे राजनाथ सिंह यांनी ठणकावले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे आज लडाखच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, येथे त्यांनी काश्मीरवरून पुन्हा एकादा पाकिस्तानला इशारा दिला. ते म्हणाले,''मी काश्मीर हा नेहमी भारताचा भाग राहिलेले आहे. मी पाकिस्तानला विचारू इच्छितो की, काश्मीर पाकिस्तानचा भाग होतेच कधी? ज्याच्यासाठी तुम्ही नेहमी रडगाणे गात असता. पाकिस्तानचा काश्मीरवर काहीही हक्क नाही.'' पाकिस्तानने त्यांच्या ताब्यातील काश्मीरमध्ये होत असलेल्या मानवाधिकारांच्या उल्लंघनाकडे लक्ष द्यावे,असेही त्यांनी सुनावले.
यापुढे काश्मीरबाबत चर्चा झाली तर ती केवळ पाकिस्तानने बळकावलेल्या काश्मीरबाबतच होईल. तसेच पीओकेच नाही तर गिलगिट-बाल्टिस्थान हासुद्धा भारताचाच भाग आहे, असेही राजनाथ सिंह यांनी सुनावले. ''काश्मीर प्रश्नाबाबत माझी अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांसोबतसुद्धा चर्चा झाली. त्यावेळी अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांनी कलम 370 हटवणे हा भारताचा अंतर्गत प्रश्न असल्याचे मान्य केले. आमचा शेजारी असेल्या पाकिस्तानसोबत चांगले संबंध ठेवण्याची आमची इच्छा आहे. मात्र त्याआधी पाकिस्तानने भारताविरोधात सुरू असलेला दहशतवादाचा वापर बंद केला पाहिजे. जोपर्यंत पाकिस्तानकडून दहशतवादाचा वापर भारताला अस्थिर करण्यासाठी करण्यात येईल तोपर्यंत आम्ही पाकिस्तानशी चर्चा कशी काय करू शकतो,'' अशी विचारणाही राजनाथ सिंह यांनी यावेळी केली. आता यापुढे पाकिस्तानशी चर्चा झालीच तर ती फक्त त्यांनी बळकावलेल्या काश्मीरसंबंधीच होईल, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी नुकतेच हरियाणातील पंचकुला येथे ठणकावून सांगितले होते. पाकिस्तानने दहशतवादास खतपाणी घालणे बंद केल्याशिवाय त्यांच्याशी चर्चा होणे शक्य नाही आणि जरी चर्चा झालीच तरी ती त्यांनी बळकावलेल्या काश्मीरखेरीज अन्य कोणत्याही विषयावर होणार नाही, असे त्यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते.