देशात काही दिवसातच लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत, या निवडणुकांची जोरदार चर्चा सुरू आहे. विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची स्थापना केली असून आता जागा वाटपाटपाची चर्चा सुरू आहे. विरोधी पक्षातील काही पक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे, सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली होती. यावर आता काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रतिक्रिया दिली.
निलेश राणेंची मनधरणी सुरू; रवींद्र चव्हाणांनी घेतली भेट, फडणवीस मध्यस्थी करणार
मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, इंडिया आघाडीतील जागा वाटपाच्या मुद्द्यावर आम्ही ५ राज्यातील निवडणुकांनंतर निर्णय घेणार आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बुधवारी दावा केला की, काँग्रेस पाचही राज्यांमध्ये सरकार स्थापन करेल. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना खर्गे म्हणाले की, छत्तीसगड आणि राजस्थानमधील काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारे योग्य पद्धतीने काम करत आहेत आणि तेथील जनता सरकारच्या कामावर समाधानी आहे.
'काँग्रेस पाचही राज्यांमध्ये सरकार स्थापन करेल. छत्तीसगड आणि राजस्थानमधील काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारे योग्य पद्धतीने काम करत आहेत आणि तेथील जनता सरकारच्या कामावर समाधानी आहे, असा दावाही काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला.
खरगे म्हणाले की, काँग्रेस पाचही राज्यांतील निवडणुकांसाठी चांगली तयारी करत आहे. काँग्रेस पक्ष सर्व राज्यांत विजयी होईल, असा विश्वास वाटतो. मध्य प्रदेशात शिवराज सरकारविरोधात लोकांमध्ये रोष आहे. भाजपने निवडणुकीतील एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही.
भाजपने जनतेला जी काही आश्वासने दिली आहेत, त्यापैकी एकही आश्वासन पूर्ण झाले नाही. मग ती बेरोजगारी असो वा शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे. केंद्र सरकार कर्नाटककडे सातत्याने दुर्लक्ष करत आहे. कर्नाटकला कोणताही केंद्रीय प्रकल्प दिला जात नाही, असंही खरगे म्हणाले.
पुढील महिन्यात मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराममध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. मिझोराममध्ये ७ नोव्हेंबरला, छत्तीसगडमध्ये ७ आणि १७ नोव्हेंबरला, मध्य प्रदेशात १७ नोव्हेंबरला, राजस्थानमध्ये २५ नोव्हेंबरला आणि तेलंगणामध्ये ३० नोव्हेंबरला निवडणुका होणार आहेत. सर्व राज्यांतील मतमोजणी ३ डिसेंबरला होणार आहे.