भांडेवाडीच्या नरकयातना कधी थांबणार ?
By admin | Published: January 31, 2017 2:06 AM
लोकांच्या आरोग्याशी खेळ : प्रशासन निगरग
लोकांच्या आरोग्याशी खेळ : प्रशासन निगरगट्ट()नागपूर : शहर स्वच्छ राहावे म्हणून शहरातील संपूर्ण कचरा भांडेवाडीत साठविण्यात येतो. परंतु या कचऱ्यामुळे भांडेवाडी परिसरातील लोकांचे आयुष्य कचरागत झाले आहे. हा कचरा येथील लोकांच्या जीवावर उठला आहे. भांडेवाडीच्या पाच किलोमीटर परिसरातील लोक कचरा डम्पिंगमुळे त्रस्त आहेत. पर्यावरणाच्या संदर्भात काम करणाऱ्या संस्थांनी येथील भयावह प्रदूषणावर चिंता व्यक्त केली आहे. हरित लवादाने महापालिकेवर दंडसुद्धा ठोठावले आहे. भांडेवाडीच्या विरोधात कित्येकदा जनआक्रोशसुद्धा रस्त्यावर उतरला होता. परंतु प्रशासनाच्या निगरगट्ट भूमिकेमुळे येथील लोकांच्या आरोग्याशी अद्यापही खेळ सुरूच आहे. प्रदूषण, घाणीचे साम्राज्य, वातावरणात २४ तास धूळ, दुर्गंधी, मृत जनावरांवर ताव मारणारे बेवारस कुत्रे हे चित्र शहरातील भांडेवाडी परिसरात नित्याचेच झाले आहे. महानगर क्षेत्रातील वाढती लोकसंख्या आणि त्यानुसार वाढणारी कचऱ्याची समस्या यानुसार कचऱ्याच्या व्यवस्थापनाचे नियोजन करण्यात आले आहे. २०११ च्या लोकसंख्येनुसार महानगर क्षेत्रात ५ लाख १ हजार १३३ मेट्रिक टन कचरा तयार होतो. २०३१ मध्ये कचरा १ कोटी ४२ लाख ५९ हजार ९७६ मेट्रिक टन निर्माण होईल असा पर्यावरणवादी संस्थांचा अंदाज आहे. भांडेवाडी डम्पिंग यार्डला लागून अनेक वस्त्या वसलेल्या आहेत. आज या वस्त्यांमध्ये आरोग्याच्या समस्या भेडसावत आहे. शहरात कुठल्याही आजाराची साथ सर्वात प्रथम भांडेवाडीतूनच होत असल्याचा संताप येथील नागरिकांनी व्यक्त केला आहे. येथील जमिनीचे पाणी प्रदूषित झाले आहे. त्यामुळे बोअर, विहीर हे पारंपारिक स्रोत नष्ट झाले आहे. भांडेवाडी डम्पिंग यार्डमधील कचऱ्यावरील प्रक्रिया केंद्र दोनदा जळाले. केंद्र बंद पडल्याने, कचरा जाळण्यात येत आहे. त्यामुळे हा परिसर २४ तास धुरात असतो. परिणामी येथील नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. याच परिसरात शहरातील रुग्णालयातील निजंर्तुकीकरण न झालेला कचरा जाळण्यात येतो. या कचऱ्यात अनेकदा शस्त्र क्रियेनंतरचे मांस, अस्थींचा समावेश असतो. शहरातील इतर भागातील मृत जनावरेही येथेच टाकल्या जातात. या मृत जनावरांवर कुत्रे ताव मारतात आणि त्यांचे अवयव येथील नागरिकांच्या घरादारापर्यंत आणून सोडतात. त्यामुळे येथील नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. कुत्रे मांसाहारी झाल्याने परिसरातील नागरिकांत त्यांची दहशत निर्माण झाली आहे.