नवी दिल्ली: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत अनेक महिन्यांपासून चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणुकीमुळे विद्यमान अध्यक्ष जेपी नड्डा यांना मुदतवाढ देण्यात आली होती. पण, आता लवकरच भाजपला नवीन अध्यक्ष मिळणार आहे. पक्षात याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. दरम्यान, आता याबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. भाजप आणि आरएसएसच्या सर्वोच्च नेतृत्वात भाजप संघटनेतील बदलांसह नवीन राष्ट्रीय अध्यक्षांबाबत चर्चा सुरू झाली आहे.
नवीन अध्यक्षांबाबत लवकरच निर्णयमीडिया रिपोर्ट्सनुसार, पाच-सहा राज्यांमधील प्रदेशाध्यक्षांच्या निवडणुका पूर्ण होताच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया औपचारिकपणे सुरू होईल. या आठवड्यात उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि झारखंडसह काही राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडणूका पूर्ण करण्याची योजना आहे. यासोबतच, नवीन अध्यक्षाच्या नावाबाबत आरएसएस आणि भाजपमधील चर्चादेखील पूर्ण होईल.
भाजपच्या संघटनेत मोठे बदल दिसून येणारनवीन अध्यक्षांसाठी संघटनेपासून ते सरकारमधील महत्त्वाच्या चेहऱ्यांपर्यंत विचार केला जात आहे. पक्षाध्यक्षपदासाठी अनेक योग्य चेहरे असल्याने भाजप आणि आरएसएसमध्ये एकाच चेहऱ्यावर सहज एकमत होण्याची अपेक्षा आहे. नवीन राष्ट्रीय अध्यक्षांसोबतच भाजपच्या संघटनेतही मोठे बदल दिसून येऊ शकतात. राष्ट्रीय सरचिटणीस आणि सचिव पदांवर अनेक नवीन चेहरे दिसू शकतात. संघटना मंत्र्यांची कमतरता दूर करण्यासाठी आरएसएसने बऱ्याच काळानंतर पूर्णवेळ प्रचारक पाठवण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. अनेक राज्यांमध्ये संघटना मंत्र्यांची पदे रिक्त आहेत. हे लक्षात घेऊन, संघाने सुमारे अर्धा डझन प्रचारकांना संघटन मंत्री म्हणून पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.