गहलोत मुख्यमंत्रिपद कधी साेडणार? राजीनाम्याबाबत काॅंग्रेसमध्ये वेगवेगळे मतप्रवाह
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2022 02:07 PM2022-09-24T14:07:42+5:302022-09-24T14:08:24+5:30
उमेदवारी अर्ज भरण्याआधी की नंतर? राजीनाम्याबाबत काॅंग्रेसमध्ये वेगवेगळे मतप्रवाह
आदेश रावल
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी राजीनामा देण्याचे वक्तव्य केलेले आहे. मात्र, ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी राजीनामा देणार की अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर राजीनामा देणार, याबाबत आता काँग्रेसमध्ये चर्चा सुरू झाली आहे.
काही जाणकारांचे म्हणणे आहे की, त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी राजीनामा दिला पाहिजे, तर गहलोत यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे की, अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतरच ते राजीनामा देतील. कारण एक व्यक्ती एक पदाचा नियम त्यांना अध्यक्ष झाल्यानंतरच लागू होईल. सध्या तर ते मुख्यमंत्री आहेत.
सचिन पायलट यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे की, गहलोत यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी राजीनामा दिला नाही, तर अध्यक्ष झाल्यानंतर ते आणखी जास्त मजबूत होतील. त्यानंतर ते सचिन पायलट यांना अधिक अडचणीत आणू शकतील. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व गहलोत यांच्यात नेमकी कोणती चर्चा झाली, याबाबत आता सर्वांच्या नजरा काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे लागल्या आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी गहलोत यांना राजीनामा द्यायचा असेल, तर त्यांना रविवारपर्यंत द्यावा लागेल. २६ सप्टेंबर रोजी गहलोत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
राजस्थानातील उत्तराधिकारी कोण?
काँग्रेस अध्यक्षपदाच्या संदर्भात राहुल गांधी यांनी ‘एक व्यक्ती एक पद’ असे विधान केले होते. त्याबाबत तसेच तुम्ही निवडणूक जिंकली तर तुमचे राजस्थानातील उत्तराधिकारी कोण असतील, याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गहलोत म्हणाले की, सोनिया गांधी आणि राजस्थानचे प्रभारी अजय माकन याबाबत निर्णय घेतील.
‘पक्षाध्यक्षपदाची निवडणूक लढवणार’
nकोची : आपण पक्षाध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहोत, असे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. निवडणूक निकालाची पर्वा न करता संघटितपणे काम करून पक्षाला मजबूत विरोधी पक्ष म्हणून उदयाला आणणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
nगेहलोत यांनी सांगितले की,पक्षातील काही मित्रदेखील निवडणूक लढवू शकतात. तथापि, एकजूट महत्त्वाची असून संघटनेला सर्व स्तरांवर बळकट करण्याची गरज आहे. पक्षातील मित्रांनी ही निवडणूक लढवली तरी अडचण नाही. आम्ही सर्वांनी पक्षाला सामर्थ्यशाली बनविण्यासाठी एकत्र काम केले पाहिजे. आपण पक्ष विचारसरणीला आधार बनवून पुढे जायला हवे. जेणेकरून आम्ही एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून उदयास येऊ.
शिर्डी : साईबाबांचे आशीर्वाद घेतले. आता पुढचा मार्ग मोकळा झाला. आपण अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करणार आहोत. राहुल गांधी यांनी गांधी कुटुंबातील कोणीही निवडणूक लढवणार नसल्याचे अगोदरच स्पष्ट केले आहे़ पक्षांतर्गत निवडणुकीनंतर पक्षमजबुतीसाठी सगळे एकदिलाने काम करू, असा विश्वास अशोक गेहलोत यांनी शिर्डीत व्यक्त केला़. गेहलोत यांनी दुपारी मध्यान्ह आरतीनंतर साईदरबारी हजेरी लावली़ आपण मुख्यमंत्रिपद सोडायला तयार नसल्याच्या चुकीच्या बातम्या माध्यमांनी दिल्या़ राजस्थान ही माझी जन्मभूमी व कर्मभूमी असल्याने मी कायम राजस्थानच्या सेवेत राहील या आपल्या वाक्याचा गैर अर्थ काढण्यात आला़. पक्षाने अनेक पदे, मानसन्मान दिला़ त्यामुळे हायकमांड सांगतील ते करणार व करावेच लागेल, असे गेहलाेत म्हणाले.