अयोध्या : ‘हर हिंदु की यही पुकार, पहले मंदिर फिर सरकार’ अशा गगनभेदी घोषणा देणारे शेकडो उत्साही शिवसैनिक, त्यांना स्थानिक नागरिकांनी दिलेली साथ आणि सगळीकडे असलेल्या भगवामय वातावरणात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी अयोध्येत ‘राम मंदिर कधी उभारणार, तारीख सांगा’ असा अल्टिमेटम सरकारला दिला. कोर्टाच्या आदेशाशिवाय नोटाबंदी होऊ शकते तर राम मंदिराची उभारणी का होऊ शकत नाही, असा सवालही त्यांनी केला.
शरयू नदीच्या काठी असलेल्या लक्ष्मण किला येथे झालेल्या आशीर्वाद व सन्मान सभेत भाजपावर टीका करत उद्धव ठाकरे म्हणाले, ‘मंदिर वही बनायेंगे’च्या घोषणा ऐकून दिवस, महिने वा वर्षेंच नाहीत तर पिढ्या गेल्या. त्या घोषणा देणाऱ्यांची अवस्था आता ‘मंदिर वही बनाएंगे, पर डेट नही बताएंगे’ अशी झाली आहे. पण आता हिंदू वाट बघणार नाही, तो प्रश्न विचारणारच.
संसदेत कायदा केला तर शिवसेना पाठीशी राहील. मात्र राम मंदिर कधी उभारणार याची तारीख सांगा’, असे त्यांनी बजावले. उद्धव यांच्या पत्नी रश्मी आणि मुलगा आदित्य ठाकरे तसेच शिवसेनेचे नेते, खासदार यावेळी हजर होते. शिकवणी लावून हिंदी भाषणाची तयारी केलेले उद्धव आज जोशात होते. राज्याबाहेरील शिवसेनेचे पहिले शक्तिप्रदर्शन यशस्वी झाले.
संतमहंतांनी उद्धव यांना आशीर्वाद दिले आणि राम मंदिराच्या उभारणीचा निर्धार पूर्ण व्हावा, अशा शुभेच्छाही दिल्या. यावेळी उद्धव म्हणाले की, अयोध्येत रामाच्या दर्शनासाठी आलो, राजकारणासाठी नाही. पहिल्यांदाच अयोध्येत आलोय, आता वारंवार येत राहणार. मंदिर बनले की रामभक्त म्हणून तर येईनच. मंदिराची उभारणी हा शिवसेनेचा शब्द आहे, असेही ते म्हणाले. राम मंदिराची उभारणी न केल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.
ठाकरे कुटुंबीयांच्या हस्ते संकल्प पूजन व श्री गणेश पूजन करण्यात आले. ते रविवारी रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत. सायंकाळी शरयू नदीचे पूजन व महाआरती करण्यात आली. याच वेळी महाराष्ट्रातही ठिकठिकाणी शिवसेनेने महाआरत्यांचे आयोजन केले.
चांदीची विट व शिवनेरीची मातीश्रीराम मंदिर न्यासाचे अध्यक्ष नृत्य गोपालदास महाराज यांच्याकडे राम मंदिर उभारणीच्या संकल्पाचे प्रतीक म्हणून उद्धव ठाकरे यांनी चांदीची विट सुपूर्द केली. तसेच, मंदिराच्या उभारणीसाठी शिवनेरीहून नेलेल्या मातीची पूजा करून ती मातीदेखील सुपूर्द केली.
अयोध्यानगरी भगवामयप्रभू रामाच्या अयोध्या नगरीत शनिवार सकाळपासून भगव्याचा डंका होता. शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमींच्या गर्दीने रस्ते फुलून गेले होते. ठाणे-मुंबईत शिवसेनेची सभा, कार्यक्रम असले की चौक अन् चौक भगवामय होतो अगदी तसेच वातावरण आज अयोध्येत दिसत होते. विश्व हिंदू परिषदेच्या वतीने अयोध्येत रविवारी धर्मसभा होत आहे पण माहोल शिवसेनेचाच दिसतोय.
ड्रोनची नजर व चोख बंदोबस्तशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे शनिवार व रविवारचे कार्यक्रम आणि विश्व हिंदू परिषदेतर्फे आयोजित धर्मसभा कोणताही अनुचित प्रकार न होता सुरळित पार पडावी यासाठी अयोध्येत कडकोड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. जागोजागच्या पोलीस पहाºयाखेरीज संवेदनशील भागांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचाही वापर करण्यात येत आहे. सुरक्षा व्यवस्थेसाठी हजारो स्थानिक पोलिसांसह निमलष्करी दलेही तैनात करण्यात आली आहेत. धर्मसभेसाठी देशभरातून तीन लाख साधू-संत व रामभक्त येतील, असा विहिंपचा दावा आहे.
शहरभर पोस्टरयुद्धफैजाबादपासून अयोध्येकडे येणारा हमरस्ता व अयोध्या शहरात शिवसेना व विहिंप यांचे एकाच मागणीसाठी पोस्टरयुद्ध रंगल्याचे चित्र दिसले. ‘सौगंध राम की खाते है, हम मंदिर भव्य बनायेंगे’, असा विहिंपच्या पोस्टरबाजीचा सूर होता. तर शिवसेनेची पोस्टर ‘हर हिंदू की यही पुकार, पहले मंदिर फिर सरकार’, असा आग्रह धरणारी होती. अयोध्यानगरी शिवसेनेच्या भगव्या झेंड्यांनी सजली होती व मराठमोळ््या घोषणांनी दणाणून जात होती.