एकनाथ शिंदे गटाला आज सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. १२ जुलैपर्यंत अपात्रतेची कारवाई करता येणार नाहीय. यामुळे या दिवसापर्यंत त्यांना विधानसभा उपाध्यक्षांनी पाठविलेल्या नोटीशीला उत्तर देण्यासाठी वेळ मिळणार आहे. परंतू, ठाकरे सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यासाठी शिंदे गट महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे. आता शिंदे गट कधी येणार याचीच शिवसेनेसह अनेकजण वाट पाहत आहेत.
शिंदे गट गुवाहाटीला थांबला आहे. कालच शिंदे यांनी २८ जूनपर्यंत असलेले ब्लू रेडिसन हॉटेलचे बुकिंग दोन दिवसांनी वाढविले होते. म्हणजेच हे बुकिंग ३० जूनपर्यंत करण्यात आले होते. आता याच हॉटेलच्या वेबसाईटवरून महत्वाची माहिती मिळत आहे. आधी ३० जूनपर्यंत सामान्यांसाठी बुकिंग बंद ठेवण्यात आले होते. ते आता ५ जुलैपर्यंत पुन्हा बंद ठेवण्यात आले आहे.
सामान्य नागरिक या हॉटेलमध्ये ६ जुलैपासून बुकिंग करू शकत आहेत. शिंदे गट या हॉटेलमध्ये आल्यापासून हॉटेल प्रशासनाने बुकिंग बंद केले होते. या हॉटेलमध्ये शिंदे गटाचे आमदार, कार्यकर्ते आणि आधीपासून ज्यांचे बुकिंग होते त्यांनाच प्रवेश दिला जात होता. सुरुवातीला २८ जूनपर्यंत बुकिंग बंद करण्यात आले होते. कालपासून ते ३० जूनपर्यंत बंद केले होते.
५ जुलैपर्यंत बुकिंग करण्याचा प्रयत्न केल्यास हॉटेलमध्ये रुम उपलब्ध नसल्याचा मेसेज येत आहे. तसेच दुसऱ्या तारखा निवडण्यास सांगितले जात आहे. याबाबतचे वृत्त दी इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. हॉटेलमधील कर्मचाऱ्याने आमदारांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर बुकिंग कालावधी वाढविला असण्याची शक्यता आहे. आम्हाला अद्याप याची माहिती देण्यात आलेली नाही, असे सांगितले.