कोरोनाचा बूस्टर डोस कधी मिळणार ? राहुल गांधींचा केंद्र सरकारला सवाल...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 12:43 PM2021-12-22T12:43:33+5:302021-12-22T12:44:18+5:30
काँग्रेस खासदार राहुल गांधींनी लसीकरणाच्या संथ प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला असून देशातील बहुतांश लोकसंख्येला अजूनही लसीकरण झाले नाही, असे म्हटले आहे.
नवी दिल्ली: मागील दोन वर्षांपासून भारत कोरोना महामारीचा सामना करत आहे. लसीकरणाची मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू आहे, पण अद्याप सर्व लोकांचे लसीकरण झालेले नाही. यातच आता कोरोनाच्या नवीन ओमायक्रॉन व्हेरिएंटने जगाची चिंता वाढवली आहे. या सर्व परिस्थितीवरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशात लसीकरणाचे काम जोरात सुरू आहे. दुसरीकडे, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी लसीकरणाच्या संथ प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून आपल्या देशातील बहुतांश लोकसंख्येला अजूनही लसीकरण झालेले नाही, असे म्हटले आहे. तसेच, बूस्टर डोस कधी मिळणार असा प्रश्नही विचारला आहे.
कोरोना रुग्णसंख्येत घट
देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 6 हजार रुग्ण आढळून आले आहेत. भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 3 कोटींवर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 4 लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. मंगळवारी (22 डिसेंबर) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 6,317 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 318 लोकांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण
दिल्ली आणि महाराष्ट्रातील ओमायक्रॉन रुग्णांचा आकडेवारी ही सर्वाधिक आहे. त्यामुळेच आता देशातील एकूण रुग्णसंख्या ही 213 वर पोहोचली आहे. ओमायक्रॉनचे जवळपास अर्ध्याहून अधिक रुग्ण महाराष्ट्र आणि दिल्लीत आहेत. दिल्लीमध्ये ओमायक्रॉनचे 57 तर महाराष्ट्रात 54 रुग्ण आहेत. आतापर्यंत 90 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.