नवी दिल्ली : कधी मुक्तता होणार? ती तारीख कारागृहात खितपत पडलेल्या कच्च्या कैद्यांना सांगा, निम्म्यापेक्षा जास्त कारावासाची शिक्षा भोगलेल्या कच्च्या कैद्यांची यादी तयार करण्याबाबत कारागृह अधिकाऱ्यांना सूचना द्या, असा आदेश केंद्रीय माहिती आयोगाने (सीआयसी) गृहमंत्रालयाला दिला आहे.कच्च्या कैद्यांच्या मुक्ततेबाबतचा निर्णय आढावा समिती घेणार होती. ही समिती स्थापन झाली काय? अशी विचारणा करीत आरटीआय अर्जदाराने तिहार कारगृह अधिकाऱ्यांकडून माहिती मागितली होती. या याचिकेची सीआयसीने दखल घेतली. सीआरपीसी कलम ४३६- ए नुसार संबंधित गुन्ह्यांसाठी असलेल्या कमाल शिक्षेच्या निम्म्या काळापर्यंतच कच्च्या कैद्याला कारागृहात ठेवता येते. फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या गुन्ह्यासाठी मात्र ही तरतूद नसते. या कलमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी न्यायदंडाधिकारी, मुख्य न्यायदंडाधिकारी किंवा सत्र न्यायाधीशांनी १ आॅक्टोबर २०१४ पासून दोन महिने दर आठवड्याला प्रत्येक कारागृहात बसून निर्णय घ्यावा असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी दिला होता. संबंधित आदेशाचा पाठपुरावा करताना मंत्रालयाने तुरुंग अधिकाऱ्यांना दर तीन महिन्यांनी कच्च्या कैद्यांची यादी तयार करण्यासंबंधी आदेशाचे काटेकोर पालन करण्यास बजावावे, असा आदेश सीआयसीने दिला.(लोकमत न्यूज नेटवर्क)
कधी सुटका होणार? ते कच्च्या कैद्यांना सांगा
By admin | Published: September 01, 2015 11:12 PM