मुंबई - भारतातील बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवून परदेशात पळालेल्या मद्यसम्राट विजय मल्ल्याने भारतात कधी येणार हे सांगतिले आहे. लंडनच्या ओव्हल मैदानावर भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी सामना पाहण्यासाठी मल्ल्या आला होता. त्यावेळी, एएनआय वृत्तसंस्थेच्या पत्रकारांनी मल्ल्याला भारतात येण्याविषयी प्रश्न विचारला. त्यावर मी मुलाखत देण्यास आलो नसल्याचे मल्ल्याने म्हटले.
किंगफिशर कंपनीचा मालक आणि भारतीय बँकांतील 9 हजार कोटींचे कर्ज बुडविणारा उद्योगपती विजय मल्ल्यालंडनमध्ये खुलेआम फिरत आहे. एकीकडे त्याला ठेवण्यासाठी आर्थर रोड कारागृहात कसाबची बराक तयार ठेवण्यात आली असताना दुसरीकडे मल्ल्या बिनधास्त भारत विरुद्ध इंग्लंडची 5 वी टेस्ट मॅच पाहण्यासाठी ओव्हलच्या स्टेडियममध्ये दाखल झाला. यावेळी एका पत्रकाराने मल्ल्याला भारतात कधी येणार ? असा प्रश्न विचारला. त्यावर, बोलताना मल्ल्याने ते न्यायालयच ठरवेल असे म्हटले. तसेच मी येथे मुलाकत देण्यासाठी आलो नसल्याचे सांगत त्याने तेथून पळ काढला. आपल्या अलिशान गाडीत बसून मल्ल्या तेथून निघून गेला. दरम्यान, सध्या मल्ल्या लंडनमध्ये असून त्याच्याविरोधात भारतात प्रत्यार्पण करण्यासाठी खटला सुरू आहे.