लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नियम व सभागृहाच्या मर्यादेनुसार आचरण कराते, असे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी म्हटले आहे तर सभागृह गैर-लोकशाही पद्धतीने चालवले जात आहे. आपल्याला बोलू दिले जात नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
शून्य प्रहरानंतर बिर्ला म्हणाले की, अनेक पिता-पुत्री, आई-मुली व पती-पत्नी या सभागृहाचे सदस्य राहिलेले आहेत. अशा स्थितीत विरोधी पक्षनेत्याकडून अपेक्षा केली जाते की, त्यांनी नियम व परंपरांचे पालन करावे. यानंतर त्यांनी सभागृहाचे कामकाज दुपारी दोनपर्यंत स्थगित केले. यानंतर काँग्रेसच्या ७० खासदारांनी बिर्ला यांची भेट घेऊन विरोधी पक्षनेत्यांना बोलण्याची संधी दिली जात नसल्याबद्दल विरोध दर्शवला.
राहुल गांधी यांनी संसद परिसरात सांगितले की, लोकसभा अध्यक्षांनी माझ्याबाबत काही वक्तव्य केले. मी बोलण्यासाठी उभा राहिलो तेव्हा ते उठून निघून गेले व सभागृहाची कार्यवाही स्थगित केली. मी सभागृहात बोलण्यासाठी उभा राहतो, तेव्हा बोलू दिले जात नाही. मी काहीही केले नाही. मी शांत बसलेलो होतो. मागील सात-आठ दिवसांपासून मी बोललेलो नाही. लोकशाहीत सरकार व विरोधी पक्षांना जागा असते. परंतु येथे लोकशाहीची जागा नाही.
अमित शाह यांच्याविरोधात हक्कभंग नोटीस
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधात राज्यसभेतील मुख्य प्रतोद जयराम रमेश यांनी हक्कभंगाची नोटीस दिली आहे. २५ मार्च रोजी वरिष्ठ सभागृहात आपत्ती व्यवस्थापन विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याबाबत टीका केल्याबद्दल ही नोटीस देण्यात आली आहे.
मातृवंदन योजनेसाठी कमी तरतूद : सोनिया गांधी
पंतप्रधान मातृवंदन योजनेसाठी फारच कमी तरतूद करण्यात आली आहे, असा आरोप काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी राज्यसभेत केला, गर्भवती महिलांना आर्थिक लाभाचा पूर्ण निधी दिला जावा, असेही त्या म्हणाल्या.
राज्यमंत्र्यांवर हक्कभंग
लोकसभेतील काँग्रेसचे मुख्य प्रतोद मणिकम टागोर यांनी ग्रामीण विकास राज्यमंत्री चंद्रशेखर पेम्मासानी यांच्या विरोधात भ्रामक वक्तव्य केल्याचा आरोप करत हक्कभंग नोटीस बजावली.