नोटबंदी नंतर मोदी सरकारने जुन्या पाचशे, हजाराच्या नोटा बंद करून नव्या पाचशे आणि दोन हजाराच्या नोटा बाजारात आणल्या होत्या. काळा पैसा संपविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा तडकाफडकी निर्णय घेतला होता. हा काळा पैसा संपला की नाही हा मुद्दा वादातीत असला तरी आता बाजारातून 2000 रुपयांच्या नोटा मात्र गायब झाल्या आहेत. या नोटा कुठे गेल्या याचे उत्तर आज मोदी सरकारने राज्यसभेत दिले आहे.
संपलेल्या नोव्हेंबरमध्ये बाजारात 2000 रुपयांच्या नोटांची संख्या घटून 223.3 कोटी नोटा राहिल्या आहेत. हा आकडा सर्व मुल्याच्या नोटांपैकी फक्त 1.75 टक्के आहे. मार्च 2018 मध्ये 2000 रुपयांच्या 336.3 कोटी नोटा चलनात होत्या. अर्थ मंत्रालयाचे राज्य मंत्री पंकज चौधरी (Pankaj Chaudhary) यांनी राज्यसभेत एका प्रश्नाला लिखित उत्तर दिले आहे.
एखाद्या मुल्याच्या नोटांची छपाई करण्याचा निर्णय सरकारद्वारे रिझर्व्ह बँकेच्या सल्ल्याने घेतला जातो. जनतेच्या व्यवहारांसंबंधी मागणीला सुविधाजनक बनविण्यासाठी या नोटा बाजारात उपलब्ध करणे ही जबाबदारी असते, असे ते म्हणाले. "31 मार्च 2018 पर्यंत, 2,000 रुपयांच्या 336.3 कोटी नोटा (MPCs) चलनात होत्या, जे प्रमाण आणि मूल्याच्या संदर्भात NIC च्या अनुक्रमे 3.27 टक्के आणि 37.26 टक्के आहेत. याच्या उलट, 26 नोव्हेंबर 2021 पर्यंत 2,233 MPC कार्यरत होते, जे प्रमाण आणि मूल्याच्या दृष्टीने NIC च्या अनुक्रमे 1.75 टक्के आणि 15.11 टक्के आहे.
नोटा कमी का झाल्या...चौधरी पुढे म्हणाले की, 2018-19 या वर्षापासून नोटांसाठी करन्सी प्रिंटिंग प्रेसमध्ये नवीन ऑर्डर देण्यात आलेली नाही. "नोटाबंदीनंतर जारी करण्यात आलेल्या 2,000 रुपयांच्या नोटांच्या चलनात घट झाली कारण 2018-19 या वर्षापासून या नोटांच्या छपाईसाठी कोणताही नवीन इंडेंट ठेवण्यात आलेला नाही. याशिवाय, नोटाही खराब झाल्यामुळे त्या चलनातून बाद झाल्या आहेत.