महाड/औसा : पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा चीनच्या राष्ट्रपतींशी झुल्यावर बसून चर्चा करीत होते; तेव्हा चीनची सेना लडाखमध्ये घुसली होती. आता पाकिस्तान भारतीय सीमेवर दररोज गोळीबार करीत आहे. पाकिस्तानला धडा शिकवू म्हणणारे मोदी कुठे आहेत, असा सवाल अखिल भारतीय काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला.बुधवारी महाड विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार माणिक जगताप व औसा (जि. लातूर) येथील काँग्रेस उमेदवार बसवराज पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. दोन्ही ठिकाणच्या सभेत बोलताना राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले, मोदी अमेरिका वारीचा डंका पिटत असले, तरी ते अमेरिकेहून परत येताच मधुमेह, कॅन्सर आणि टीबीसारख्या रोगावरील औषधाच्या किमती कशा वाढल्या हे सांगत नाहीत. गरिबांचा कळवळा केवळ भाषणात असून चालत नाही, कृतीत असावा लागतो, असा चिमटाही त्यांनी काढला.भाजपाला सत्ता दिल्यास महाराष्ट्रात गुजरात मॉडेल आणू म्हणणारे मोदी कोणत्या क्षेत्रात गुजरात महाराष्ट्राच्या पुढे आहे, हे त्यांनी दाखवून द्यावे, असे आवाहन देत राहुल म्हणाले, काँग्रेस सरकारने नेहमी गरिबांच्या हिताची कामे केली. उद्योगपतींची नाही. काँग्रेसने केलेल्या भूसंपादनाच्या कायद्यामुळे जमिनमालकांना मावेजा जास्तीचा मिळाला. अन्नसुरक्षेने भूकेल्यांना अन्न दिले. शिक्षणाचा ‘अधिकार’ दिला. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. वीजबिल माफ केले. जेव्हा शेतकऱ्यांवर संकट आले तेव्हा शब्द कामाचे नसतात म्हणून थेट मदतही काँग्रेस सरकारने केल्याचे त्यांनी सांगितले. गरीब, कष्टकरी, कामगार तसेच दुर्बल, दलित घटकांना न्याय देण्यासाठी मनमोहन सिंह यांच्या सरकारने योजना सुरू केल्या. मात्र या योजना बंद करण्याचे धोरण मोदी सरकारने अवलंबले आहे, असेही राहुल म्हणाले. (प्रतिनिधी)
पाकला धडा शिकवू म्हणणारे आहेत कुठे?
By admin | Published: October 09, 2014 5:02 AM