गेल्या तीन महिन्यांपासून ईशान्य भारतातील मणिपूर हे राज्य भीषण दंगलीमध्ये होरपळत आहे. दरम्यान, मणिपूरमध्ये अशांतता माजणवण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणावर हिंसाचार घडवण्यासाठी सीमेपलीकडून कट रचला जात आहे. याबाबत झी न्यूजच्या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार मणिपूरसह ईशान्य भारतात सक्रिय असलेल्या अतिरेक्यांना मोठ्या प्रमाणावर चिनी हत्यारे पुरवली जात आहेत. चीनमध्य तयार झालेल्या या हत्यारांचा वापर हा मणिपूरमध्ये हिंसाचार माजवण्यासाठी केला जात असल्याचा संशय सुरक्षा यंत्रणांना आहे.
मणिपूरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून हिंसाचार सुरू आहे. या हिंसाचारासाठी ज्या हत्यारांचा वापर केला जात आहे, त्यामधील अनेक हत्यारे ही चीनमध्ये बनवलेली आहेत. म्यानमार आणि चीनच्या सीमेवर असलेल्या ब्लॅक मार्केटमधून ही हत्यारे म्यानमारच्या सीमेमध्ये आणण्यात येत आहेत. तिथून ही हत्यारे मणिपूरमध्ये पाठवण्याचा कट आखला जात असल्याचा गुप्तचर यंत्रणांना संशय आहे.
मणिपूरसह ईशान्य भारतात हिंसाचार माजवण्यासाठी अतिरेकी गटांकडून वापरण्यात येत असलेल्या चीनी हत्यारांबाबत सुरक्षा यंत्रणांना माहिती मिळाली आहे. पूर्वोत्तर राज्यांमध्ये सक्रिय असलेल्या अतिरेक्यांकडे ज्या प्रकारे चिनी हत्यारे पोहोचत आहेत, ती चिंतेची बाब आहे, असे तज्ज्ञांनी म्हटलं आहे. मणिपूरमध्येही अतिरेकी समुहांकडून याच हत्यारांच्या मदतीने हिंसाचार माजवण्यात येत आहे. अतिरेक्यांचे अनेक कमांडर हे चीनमध्ये लपून असल्याची गोपनीय माहिती आहे. त्यामुळे चीनच्या भूमिकेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
सुरक्षा यंत्रणांच्या मते मणिपूरमधील हिंसाचारामध्ये ज्या चिनी हत्यारांचा वापर अतिरेकी गटांकडून केला जात आहे, त्यामध्ये चिनी पिस्तुलांपासून ते असॉल्ट रायफलपर्यंतच्या शस्त्रांचा समावेश आहे. भारत आणि म्यानमारमध्ये असलेल्या खुल्या सीमेमधून हत्यारे भारतीय हद्दीत मणिपूरमध्ये पाठवण्याचा कट आखत असल्याची गुप्तचर यंत्रणांना शंका आहे. मणिपूरमध्ये हिंसाचार रोखण्यासाठी सीमेवर आसाम रायफल्सला अलर्ट करण्यात आले आहे. तसेच भारत आणि म्यानमारमधील खुल्या सीमारेषेवर सातत्याने नजर ठेवली जात आहे.