धीरज साहूंकडे इतका पैसा कुठून आला? कांग्रेस म्हणते- 'अनेक वर्षांपासून त्यांचा व्यवसाय...'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 06:47 PM2023-12-11T18:47:26+5:302023-12-11T18:47:38+5:30
काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी म्हणतात- सरकारने चौकशी करावी, आमचा त्या पैशांशी संबंध नाही.
Congress MP Dheeraj Sahu: आयकर विभागाने काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्या ठिकाणांवर छापे टाकून आतापर्यंत 350 कोटींहून अधिकची रोकड जप्त केली आहे. धीरज साहू यांच्याकडे एवढी मोठी रक्कम कुठून आली, यावरुन गदारोळ सुरू आहे. या प्रकरणावरुन भाजप काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे, तर काँग्रेस स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.
#WATCH | Winter Session of Parliament | On over Rs 200 crore cash recovered in the raid on Congress MP Dheeraj Sahu, Congress MP Adhir Ranjan Chowdhury says, "This has nothing to do with the Congress party. It has no connection with the party... The government should investigate… pic.twitter.com/WeYzPNjYpk
— ANI (@ANI) December 11, 2023
दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार अधीर रंजन चौधरी यांनी धीरज साहू प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. साहू यांच्याकडे सापडलेल्या पैशांशी काँग्रेस पक्षाचा काहीही संबंध नाही. त्यांच्या कुटुंबाचा अनेक वर्षांपासून स्वतःचा व्यवसाय आहे. हा पैसा त्यांनी कुठून आणि कसा कमावला, याची चौकशी सरकारने करावी. यानंतर मोदी सरकारवर हल्लाबोल करताना अधीर रंजन चौधरी म्हणतात की, सध्या ज्या जोमाने हा मुद्दा उपस्थित केला जातो...नीरव मोदी, मेहुल चोक्सीच्या काळात हे लोक (भाजप) काय करत होते? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
धीरज साहूंनी स्वतः उत्तर द्यावे
धीरज साहू प्रकरणावर काँग्रेस खासदार केसी वेणुगोपाल म्हणाले की, आमची भूमिका पूर्णपणे स्पष्ट आहे. काँग्रेसचा याच्याशी काहीही संबंध नाही. त्यांच्या घरातून एवढी रक्कम कशी जप्त झाली, याचा खुलासा धीरज साहू यांनीच करावा.
राहुल गांधींना उत्तर द्यावे लागेल
या संपूर्ण प्रकरणात भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि झारखंड प्रभारी लक्ष्मीकांत बाजपेयी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले की, भ्रष्टाचाराच्या आरोपापासून लक्ष हटवण्यासाठी I.N.D.I.A आघाडी बनवली. परंतु वसुलीचे त्यांचे स्वप्न भंग झाले. काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्याकडे इतकी मोठी रक्कम मिळाली त्यावर राहुल गांधींना उत्तर द्यावे लागेल. हा पैसा कुणाचा आहे आणि त्याचा हेतू काय होता असं त्यांनी विचारले.