ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २३ - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडणुकांच्यावेळी न खाऊंगा न खाने दुंगा असे सांगत लोकांच्या मनात विश्वास निर्माण केला परंतु त्यांनी आपलाच नाही तर जनतेचा भ्रमनिरास केला असल्याचा आरोप करत काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधींनी गुरुवारी भाजपावर हल्ला चढवला. ललित मोदींसारख्या भगोड्याला सहाय्य करत सुषमा स्वराज यांनी फौजदारी गुन्हा केल्याचे गांधी म्हणाले तसेच या सगळ्यावर नरेंद्र मोदी काहीच का बोलत नाही असा सवाल गांधींनी उपस्थित केला आहे.
सुषमा स्वराज प्रकरण असेल, वसुंधरा राजे, व्यापम घोटाळा, छत्तीसगड अशा अनेक प्रकरणांवर मोदी गप्प का आहेत असे सांगतानाच मोदी शांत राहिले तर मलाच फायदा होत आहे पण जनतेला उत्तरं हवी आहेत असंही त्यांनी सांगितले. विरोधकांनी केलेल्या गोंधळामुळे लोकसभा दिवसभरासाठी तर राज्यसभा दुपारपर्यंत तहकूब करण्यात आली.
दरम्यान, भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी मात्र काँग्रेसने आधी चर्चा करावी त्याआधी कुणाचाही राजीनामा घेण्यात येणार नाही असे स्पष्ट केले. राहूल गांधींनी स्वराज यांच्या राजीनाम्याखेरीज चर्चा नाही अशी भूमिका घेतली तर चर्चेआधी राजीनाम्याचा प्रश्नच नाही असं प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे या अधिवेशनाचे काय होणार हा प्रश्नच उपस्थित झाला आहे.
तसेच भाजपाने काँग्रेसशासित सात राज्यांमध्ये भ्रष्टाचाराची प्रकरणे उघड झाली असून काँग्रेस त्या त्या राज्यांमधल्या नेत्यांचे राजीनीमे का घेत नाही असा सवाल विचारला आहे. काँग्रेसने या मुद्यांवर पाठिंबा मिळावा म्हणून अन्य पक्षांशी बोलणी सुरू ठेवली आहेत.