लखनौ - जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग येथे दहशतवाद्यांशी दोनहात करताना सैन्यातील मेजर केतन शर्मा यांना वीरगती प्राप्त झाली. उत्तर प्रदेशच्या मेरठचे सुपुत्र मेजर केतन शर्मा हे शहीद झाल्याची बातमी गावाकडे समजताच, कुटुंबासह गावभर शोककळा पसरली. 29 वर्षीय केतन शर्मा हे काही दिवसांपूर्वीच आपली सुट्टी संपवून सीमारेषवर कर्तव्यासाठी रुजू झाले होते. तर, सुट्टी संपवून परतत असताना, मी लवकरच घरी वापस येईन, असेही शर्मा म्हणाले होते.
केतन शर्मा यांचे पार्थिव मंगळवारी त्यांच्या मेरठ येथील राहत्या घरी पोहोचले. यावेळी सैन्य दलातील अधिकारीही शर्मा कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी आले होते. तत्पूर्वी संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी मेजर केतन शर्मा यांना श्रद्धांजली वाहिली. केतन यांचे पार्थिव आपल्या घरी येताच कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले. तर, केतन यांच्या आईने हंबरडा फोडला. मेरा शेर बेटा कहाँ है... असे म्हणत शहीद मेजर केतन यांच्या आईने अश्रूंना वाट मोकळी करुन दिली. कुटुंबीयांचा आक्रोश पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले होते. यावेळी, सैन्यातील अधिकाऱ्यांनी केतन यांच्या आईंसह संपूर्ण कुटुंबियांचे सांत्वन केले. तीन वर्षीय चिमुकलीने बाप गमावला
केतन शर्मा यांचे पाच वर्षांपूर्वीच लग्न झाले होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबात आई-वडिलांसह पत्नी ईरा आणि तीन वर्षाची चिमुकली कायरा असा परिवार आहे. तीन वर्षीय कायराला आपल्या घरी काय घडलंय? याचा लवलेशही नाही. सन 2012 मध्ये आयएमए डेहराडून येथून सैन्यात लेफ्टनंट बनले होते. त्यानंतर, केतन यांची पहिली पोस्टींग पुण्यात झाली. तर दोन वर्षांपूर्वीच त्यांना अनंतनाग येथे पाठविण्यात आले होते.