सध्या उत्तराखंडमधीलकेदारनाथ मंदिराच्या गर्भगृहाला सुवर्णजडित करण्यासाठी वापरण्यात आलेल्या सोन्याचा मुद्दा वादाचं केंद्र बनलेला आहे. शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला असतानाच, केदारनाथमध्ये लावलेलं २३ किलो सोनं गेलं कुठं, असा प्रश्न काँग्रेसकडूनही उपस्थित करण्यात येत होता. तसेच गर्भगृहात लावलेलं सोनं काळवंडलं कसं, असा प्रश्नही काँग्रेसकडून उपस्थित केला गेला होता. अखेर या सर्व वादावर मंदिर समितीने पुढे येत उत्तर दिलं आहे.
२०२२ मध्ये केदारनाथ मंदिराचं गर्भगृह सुवर्णजडित करण्यात आलं होतं. तेव्हापासून येथील सोन्यावरून वाद सुरू आहे. आता मंदिर समितीने समोर येत सर्व पावती पुराव्यांसह आपलं म्हणणं मांडलं आहे. मंदिर समितीने सांगितलं की, केदारनाथ मंदिराच्या गर्भगृहाला सुवर्णजडित करण्यासाठी २३ किलो ७७७.८०० ग्रॅम सोन्याचा वापर करण्यात आला होता. त्याची बाजारातील किंमत १४ कोटी ३८ लाख रुपये एवढी आहे. तसेच या कामामध्ये एक हजार किलोग्रॅम वजनाच्या कॉपर प्लेटचाही वापर करण्यात आला. त्याची किंमत २९ लाख रुपये एवढी आहे.
मंदिर समितीच्या सीईओंनी सांगितलं की, गर्भगृहाला सुवर्णजडित करण्यासाठीचं कार्य दात्याने स्वत: वैयक्तिकरीत्या पूर्ण केले. या दात्याने ज्वेलर्सकडून तांब्याच्या प्लेट तयार करून घेतल्या. त्यानंतर त्यावर सोन्याचा पत्रा लावला. त्यानंतर ज्वेलर्सच्या माध्यमातूनच या प्लेट मंदिराच्या गर्भगृहामध्ये स्थापिन केल्या. यासाठी लागणाऱ्या सुवर्णखरेदीपासून ते मंदिरात ते स्थापित करण्यापर्यंतचं सगळं काम दात्याने आपल्या पातळीवर स्वत: केलं. मंदिर समितीची यामध्ये स्वत:ची कुठलीही भूमिका नव्हती.
मंदिर समितीने सांगितलं की, दात्याने २००५ मध्ये बद्रिनाथ मंदिराच्या गाभाऱ्यालाही सुवर्णजडित केले होते. मात्र यावेळी एका नियोजनबद्ध कटकारस्थानानुसार आरोप केले जात आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या प्रयत्नांच्या माध्यमातून केदारनाथ धामचं सौंदर्यीकरण झालं आहे. तसेच येथे येणाऱ्या भाविकांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. ही बाब काही राजकीय तत्त्वांना रुचलेली नाही. दरम्यान, अपप्रचार करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.